इचलकरंजीवर पाणीटंचाईचे सावट

By Admin | Updated: January 20, 2015 23:36 IST2015-01-20T22:02:52+5:302015-01-20T23:36:56+5:30

पंचगंगेत जलपर्णीचा विळखा : नदीचे पाणी प्रदूषित झाल्यास तेथील पाण्याचा उपसा बंद ?

Water shortage at Ichalkaranji | इचलकरंजीवर पाणीटंचाईचे सावट

इचलकरंजीवर पाणीटंचाईचे सावट

इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीपात्रात जलपर्णी जमा होण्यास सुरुवात झाली असून, त्यामुळे पंचगंगेचा पाणी उपसा बंद होण्याचे संकेत मिळत आहेत. परिणामी इचलकरंजीकरांना लवकरच पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.शहरास मजरेवाडी (ता. शिरोळ) येथून कृष्णा नदीतून आणि येथील पंचगंगा नदीवरून पाणीपुरवठा होतो. या दोन्ही नद्यांतून होणारा पाणीपुरवठा येथील जलशुद्धिकरण केंद्रात शुद्ध करून ते पाणी नळाद्वारे शहरवासीयांना दिले जाते. सध्या सुमारे ४५ दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा नागरिकांना केला जातो. मात्र, हे पाणी दोन दिवसांतून एकवेळ किंवा एक दिवसाआड अशा पद्धतीने पुरविले जाते. पंचगंगा नदीचे पाणी प्रदूषित झाल्यास तेथील पाण्याचा उपसा बंद केला जातो.सध्या पंचगंगा नदीपात्रात जलपर्णी जमा होऊ लागली आहे. जलपर्णी म्हणजे पाणी दूषित होण्याचे प्रतीक मानले जाते. पंचगंगा नदीतील पाणी अधिक दूषित झाल्यास पंचगंगा नदीतून होणारा पाणीपुरवठा बंद केला जातो. त्यामुळे कृष्णा नदीतून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरच इचलकरंजीकरांना अवलंबून राहावे लागणार आहे. परिणामी कृष्णा नदीतून होणारा पाणीपुरवठा दोन दिवसाआड म्हणजे तीन दिवसांतून एकवेळ होणार असल्याने आतापासूनच पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

याला जबाबदार कोण?
पंचगंगा नदीपात्रामध्ये नदीकाठावर असलेली शहरे व खेडेगावांचे सांडपाणी मिसळत असल्याने नदीचे पाणी प्रदूषित होते. अशा पार्श्वभूमीवर पंचगंगा नदी शुद्ध करण्याची मोहीम सरकारने हाती घेण्याचे ठरविले आहे. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनसुद्धा नदीतील पाणी दूषित होऊ नये, याची दक्षता घेतली जाते; पण पंचगंगा नदीघाटावर नागरिकांकडून चारचाकी वाहने व जनावरे राजरोसपणे धुतली जात आहेत. तसेच कपडेही धुतले जातात. त्याबाबत नगरपालिकेकडून डोळेझाक होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

Web Title: Water shortage at Ichalkaranji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.