चंदगडला २४ गावे, १९ वाड्यांमध्ये पाणीटंचाई
By Admin | Updated: December 21, 2015 00:39 IST2015-12-21T00:17:59+5:302015-12-21T00:39:44+5:30
उपाययोजना आराखडा सादर : पाणीटंचाई निवारण्यासाठी ३७ लाख रुपये खर्च अपेक्षित

चंदगडला २४ गावे, १९ वाड्यांमध्ये पाणीटंचाई
चंदगड : मुबलक पाणी असणाऱ्या चंदगड तालुक्यात यावर्षी पावसाने दगा दिल्याने व पाटबंधारे विभागाच्या चुकीमुळे पाणीटंचाई जाणवणार आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी तब्बल ५०० मि.मी. पाऊस कमी झाल्याने चंदगड तालुक्यातील तलावामध्ये कमी प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. साठवलेले पाणीही पाटबंधारे विभागाने ताम्रपर्णी नदीत न अडवल्याने ते कर्नाटकात वाहून जात आहे. त्यामुळे नदीत पाणीसाठा न झाल्याने शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने २४ गावे, १९ वाड्यांवर तीव्र पाणीटंचाई भासणार असल्याने उपाययोजना करण्यासाठीचा आराखडा जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला आहे.
चंदगड तालुक्यातील झांबर, जंगमहट्टी, हेरे, आंबेवाडी व इतर प्रकल्पांत प्रमाणापेक्षा कमी पाणीसाठा झाला. त्यातच पाटबंधारे विभागाने ताम्रपर्णी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना बरगे न घातल्याने पाणी सरळ कर्नाटकात वाहून जात आहे. पाणी नदीत न साठवल्याने जवळपासच्या विहिरींनाही पाणी नाही. त्यामुळे विहिरीवर अवलंबून असणाऱ्या गावांना व शेतकऱ्यांना पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. भविष्यात या गावांना तीव्र टंचाई भासू नये यासाठी पाणीपुरवठा विभागाने ६ सार्वजनिक विहिरी खोल करणे, ६ खासगी विहिरी अधिग्रहण करणे, प्रगतिपथावर असलेल्या ४ गावांच्या नळपाणी योजना तातडीने पूर्ण करणे, २३ गावांत नवीन विंधन विहीर खोदणे, २ गावांच्या नळपाणी योजना दुरुस्त करणे, आदी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
डुक्करवाडी, दाटे, तुडये, सातेरी टोक, गुडेवाडी, हाजगोळी, शिंदेवाडी, चिंचणे, नांदवडे, माडवळे, पाशिवाडा, मोटणवाडी, मौजे व मजरे जट्टेवाडी, खळणेकरवाडी, बांदराई, नगरगाव, आबेमाळ, पारगड नामखोल, वाघोत्रे, लक्कीकट्टे, कोरज या गावांना नवीन विंधन विहीर घेणे गरजेचे आहे, तर मोरेवाडी, देवरवाडी, सुंडी, कौलगे, तुडये/महादेवनगर, बागिलगे या गावांसाठी खासगी विहीर अधिग्रहण केल्यास पाणीटंचाई निवारण होईल. मळवीवाडी, कल्याणपूर, वाळकोळी, जक्कनहट्टी या ठिकाणच्या सार्वजनिक विहिरींतील गाळ काढणे, विहीर खोल कराव्या लागणार आहेत. शिवणगे, हाजगोळी / शिंदेवाडी येथील नळपाणी योजनांची दुरुस्ती करावी लागणार आहे. नागरदळे, चिंचणे येथे तात्पुरती नळपाणी योजना सुरू करण्याबाबत उपाय सुचविला आहे. सुंडी, महिपाळगड, बुक्कीहाळ, होसूर येथील नळपाणी योजना तातडीने सुरू करण्याबाबतची उपाययोजना या विभागाकडून करण्यात आली आहे.
नागरिकांना पाणी टंचाईची समस्या जाणवू नये यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून टंचाई निवारण आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी ३७ लाख २८ हजार रुपये अपेक्षित आहेत. आमदार संध्यादेवी कुपेकर, गटविकास अधिकारी एस. डी. सोनवणे, सभापती ज्योती पाटील, शांताराम पाटील यांच्या स्वाक्षरीचे निवेदन जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
ग्रामपंचायतींनी १५०० भरावेत
चंदगड तालुक्यात २०० हून अधिक सुस्थित असलेले बोअरवेल आहेत. या बोअरची खासगी दुरुस्ती करून घेतल्यास ग्रामपंचायतींना भरमसाट खर्च येतो. त्यासाठी ग्रामपंचायतींनी पंचायत समितीच्या यांत्रिकी विभागाकडे १५०० रुपये भरल्यास वर्षभर कितीही वेळा मोफत बोअरवेलची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींनी १५०० रुपये या विभागाकडे भरावेत, असे आवाहनही उपअभियंता ए. एस. सावळगी यांनी केले आहे.