किल्ले पारगडवर पाण्याची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:40 IST2021-05-05T04:40:21+5:302021-05-05T04:40:21+5:30

चंदगड : ऐतिहासिक किल्ले पारगड (ता. चंदगड) वरील तलाव कोरडे पडल्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले असून पारगडवासीयांना पाण्यासाठी पायपीट ...

Water scarcity at Fort Pargad | किल्ले पारगडवर पाण्याची टंचाई

किल्ले पारगडवर पाण्याची टंचाई

चंदगड :

ऐतिहासिक किल्ले पारगड (ता. चंदगड) वरील तलाव कोरडे पडल्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले असून पारगडवासीयांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. या गंभीर परिस्थितीला वनविभाग व पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाची दिरंगाई कारणीभूत आहे, असा आरोप पारगड रहिवाशांनी केला असून ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

दरवर्षी मार्च ते जून महिन्यात तलाव कोरडे पडतात. त्यामुळे निसर्ग व ऐतिहासिक पर्यटनाला मोठ्या प्रमाणात खीळ बसते. शिवाय गडावरील रहिवाशांना पाण्याअभावी अन्यत्र स्थलांतरित होण्याची नामुष्की ओढवते.

४८ एकर क्षेत्रांवर पसरलेला किल्ला बांधताना गडावरील रहिवाशी, मावळे व घोडदळ आदींच्या पाण्याच्या सुविधेसाठी छत्रपती शिवरायांनी १६७६ मध्ये बांधलेले गणेश, गुंजन, महादेव व फाटक हे चार तलाव व विहिरी साडेतीनशे वर्षांपासून आजतागायत सेवा देत आहेत.

तथापि, पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे पाणी अपुरे पडत आहे. यातील तलाव व काही विहिरींची डागडुजी करण्याची योजना वनखात्याकडे मंजूर आहे. काही दिवसांपूर्वीच कोल्हापूर परिक्षेत्र उपवनसंरक्षक काळे यांनी गडावर भेट देऊन याची पाहणीही केली आहे. मात्र, कामाचा पत्ता नाही.

सध्या तलावात पाणी नसल्यामुळे पावसाळ्यापूर्वी डागडुजी होणे गरजेचे आहे. वनखात्याकडून चालढकल सुरू आहे, असा आरोपही रहिवाशी करत आहेत.

शासनातर्फे ‘राई’तून नळपाणी पुरवठा योजना राबविणे व किल्ल्यावरील तलाव, विहिरींची डागडुजी ही कामे तत्काळ मार्गी लावावीत, अशी मागणी किल्ल्ले पारगड रहिवाशी व पर्यटकांतून करण्यात आली आहे. ही दिरंगाई अशीच सुरू राहिल्यास तालुक्यातील दोन्ही कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते कान्होबा माळवे, प्रकाश चिरमुरे, आदी पारगड रहिवाशांनी दिला आहे.

-------------------------

* पारगडवर कायमस्वरूपी उपाय म्हणून गडाच्या पूर्वेकडील राई परिसरातून पाणी आणण्यासंदर्भात योजना तयार आहे. तथापि, योजनेची कागदपत्रे पाणीपुरवठा विभाग पं. स. चंदगडकडून तीन वर्षे झाली तरी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आलेली नाहीत, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार यांनी केला आहे.

---------------------

* पारगडवर नवीन पाणी योजना कार्यान्वित व्हावी म्हणून पं. स. पाणीपुरवठा विभागाकडून योग्य ती कागदपत्रे जि. प. पाणीपुरवठा विभागाकडे तांत्रिक मंजुरीसाठी पाठवली आहेत. तथापि, वनविभागालाही जागा मंजुरीसाठी पत्रव्यवहार केला आहे.

- ए. एस. सावळगी, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, पं. स. चंदगड.

-------------------------

* फोटो ओळी : पारगडवरील कोरडा पडलेला गणेश तलाव.

क्रमांक : ०४०५२०२१-गड-०६

Web Title: Water scarcity at Fort Pargad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.