पंचगंगेवरील गावांना पाणी शुद्धिकरण यंत्रे : जिल्हा नियोजन समिती बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 12:55 AM2018-06-21T00:55:46+5:302018-06-21T00:55:46+5:30

पंचगंगा नदीचे प्रदूषण वाढल्याने या नदीच्या तिरावरील गावांना पिण्याचे पाणी शुद्धिकरण (वॉटर प्युरिफायर) करणारी यंत्रे त्या परिसरातील खासगी कंपन्यांच्या

Water purification plants for villages on Panchganga: District Planning Committee meeting | पंचगंगेवरील गावांना पाणी शुद्धिकरण यंत्रे : जिल्हा नियोजन समिती बैठक

पंचगंगेवरील गावांना पाणी शुद्धिकरण यंत्रे : जिल्हा नियोजन समिती बैठक

Next
ठळक मुद्देपालकमंत्री पाटील यांची माहिती; प्रदूषण रोखण्यासाठी पुन्हा आराखडा करणार

कोल्हापूर : पंचगंगा नदीचे प्रदूषण वाढल्याने या नदीच्या तिरावरील गावांना पिण्याचे पाणी शुद्धिकरण (वॉटर प्युरिफायर) करणारी यंत्रे त्या परिसरातील खासगी कंपन्यांच्या ‘सीएसआर’ निधीतून देण्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा परिषदेतर्फे नदीकाठावरील गावांचे सांडपाणी रोखण्याचा आराखडा नव्यानेकरण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर मंत्री पाटील यांनी बैठकीतील महत्त्वाच्या निर्णयांची माहिती पत्रकारांना दिली. ते म्हणाले,‘पंचगंगेचे प्रदूषण हा सध्याचा चिंतेचा विषय बनला आहे. त्यामध्ये नदीकाठावरील गावांतील सांडपाण्याचाही हिस्सा आहे. त्यामुळे या पाण्याची निर्गत किंवा पुर्नवापर कसा करता येईल यासाठीचा आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेला दिल्या आहेत. नागपूर महापालिकेने अशा पाण्यातून ऊर्जानिर्मिती करून १९ कोटी रुपये मिळविले आहेत; परंतु तोपर्यंत या गावांतील लोकांना प्रदूषित पाणी प्यायला लागू नये यासाठी त्यांच्यासाठी त्या परिसरातील खासगी कंपन्यांच्या सीएसआर निधीतून प्रत्येक गावांना पाणी शुद्धिकरण यंत्रणा उभी करून दिली जाईल. अशा निधीतून सध्या जिल्हा परिषदेच्या शाळा दुरूस्तीचे काम आम्ही हाती घेतले आहे व त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.’

जिल्हा वार्षिक योजनेतून यावर्षी कोल्हापूरला ३६४ कोटी ८३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. हा निधी गतवर्षीपेक्षा ५.४१ टक्क्यांनी जास्त आहे. गतवर्षी ९९ टक्के निधी खर्च झाला; परंतु त्यासाठी खूप रक्त आटवावे लागले, असे सांगून मंत्री पाटील म्हणाले, ‘यावर्षी तसे होऊ नये यासाठी सर्व ५२ विभागांनी निधी खर्च करण्याचे आराखडे १ आॅगस्टपर्यंत द्यावेत. त्याचा जिल्हाधिकारी खातेप्रमुखांची बैठक घेऊन दरमहा आढावा घेतील. मी स्वत: महिन्याला दोन तास वेळ काढून जिल्हाधिकारी कार्यालयात बसणार आहे व या निधीचा आढावा घेणार आहे. कोणत्याही निधीचे खर्चाचे प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय निधी दिला जाणार नाही.’यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, महापालिका आयुक्त अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, नियोजन अधिकारी सरिता यादव, आदी उपस्थित होते.

केंदाळ काढण्यासाठी मशीन देणार
रंकाळा तलाव तसेच पंचगंगा नदीमध्ये निर्माण झालेली जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेला मशीन उपलब्ध करून दिले जाईल, यासाठी महापालिकेने प्रस्ताव तत्काळ द्यावा. नंतर पंचगंगा नदीवरील जलपर्णी प्राधान्याने काढावी, याकामी पाटबंधारे विभागाने पुढाकार घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली. नियोजन समितीतील जि. प. सदस्यांना दिल्या जाणाऱ्या निधीच्या धर्तीवर निमंत्रित सदस्यांनाही यावर्षीपासून निधी उपलबध करून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. गेल्यावर्षी साकव उभारणीसाठी ३३ कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. यावर्षी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ८० गावांची निवड केल्याचे सांगण्यात आले.
 

प्रत्येक कामाचे होणार ‘आॅडिट’
जिल्हा वार्षिक योजना निधीतून जी कामे होतात, त्या प्रत्येक कामाचे प्रत्यक्ष जागेवर जावून लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी तंत्रशिक्षण झालेल्या ३० जणांचे पॅनेल तयार केले आहे. त्यांच्याकडून आॅडिट झाल्यावरच संबंधित कामाचे बिल काढले जाईल, असे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

आमदारांचे अपयश.. : आमदार आदर्श गाव योजनांमध्ये संबंधित आमदारानेच निधीबाबत पाठपुरावा करून त्या गावाचा विकास करायचा अशी योजना आहे. मी स्वत: जबाबदारी घेतलेल्या वाळवे (ता. राधानगरी) गावांत आता एकही प्रश्न राहिलेला नाही. मी स्वत: माझ्या निधीतून तिथे एक एमएसडब्ल्यू झालेला तरुण नियुक्त केला आहे. त्याच्यामार्फत पाठपुरावा केला जातो. यावर्षी गडहिंग्लज तालुक्यातील हनिमनाळ गाव घेतले आहे. शासन २५ कोटी देणार आणि मग आपण विकास करू, असे आमदारांना वाटते परंतु तशी ही योजना नाही, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

श्रावणामध्ये
धार्मिक पर्यटन
‘आडवाटेवरचे कोल्हापूर’ला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामध्ये राज्यभरातून १७०० पर्यटक सहभागी झाले.
त्याच धर्तीवर श्रावण महिन्यात एक दिवसा आड अंबाबाई मंदिर, रामलिंग, नृसिंहवाडी व खिद्रापूर अशा चार धार्मिक स्थळांना सहलीचे आयोजन करण्यात येणार
आहे.


 

Web Title: Water purification plants for villages on Panchganga: District Planning Committee meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.