ताराबाई रोड परिसरात पाण्याचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:22 IST2021-03-26T04:22:32+5:302021-03-26T04:22:32+5:30

कोल्हापूर : महाद्वार व ताराबाई रोड परिसरात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना कपिलतीर्थातील स्वच्छतागृहास बेकायदेशीर नळजोडणी ...

Water problem in Tarabai Road area is serious | ताराबाई रोड परिसरात पाण्याचा प्रश्न गंभीर

ताराबाई रोड परिसरात पाण्याचा प्रश्न गंभीर

कोल्हापूर : महाद्वार व ताराबाई रोड परिसरात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना कपिलतीर्थातील स्वच्छतागृहास बेकायदेशीर नळजोडणी दिल्यामुळे संतप्त नागरिकांनी जल अभियंता नारायण भोसले यांना सुमारे एक तास घेराव घालून त्यांना धारेवर धरले. शहरातील कपिलतीर्थ, वांगी बोळ, दातार बोळ, तोफखाने बोळ, पोतनीस बोळ, गुरुमहाराज वाडा परिसरात सातत्याने कमी दाबाने आणि अपुरा पाणी पुरवठा होत आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्नाची निर्गत झाली नाही. अशातच बुधवारी रात्री बेकायदेशीरपणे कपिलतीर्थातील स्वच्छतागृहात नळ कनेक्शन देण्यात आले. त्याची माहिती होताच माजी नगरसेवक अजित ठाणेकर भाजपा सरचिटणीस हेमंत आराध्ये, अशोक देसाई यांच्या नेतृत्वाखाली नागरिक कपिलतीर्थात जमा झाले. जल अभियंता नारायण भोसले यांना बोलावण्यात आले.

जल अभियंता आल्यानंतर नागरिक व महिलांनी त्यांना घेराव घालून यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. ज्या कर्मचाऱ्यांने नळजोडणीला परवानगी दिली त्याला निलंबित करून चौकशी करावी, अशी मागणी अजित ठाणेकर यांनी केली. हेमंत आराध्ये यांनी, ‘जोपर्यंत कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही’ असे ठणकावून सांगितले. पुरेसे पाणी द्या मग इथून जा, असे महिलांनी नारायण भोसले यांना सुनावले.

नागरिकांच्या रोषामुळे जल अभियंत्यांनी कामगार बोलून बेकायदेशीरपणे जोडण्यात आलेले कनेक्शन तोडून टाकले. तसेच दिलेल्या जोडणीच्या बाबत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासनही दिले. यावेळी भाजपा शिवाजी पेठ मंडल अध्यक्ष प्रदीप पंडे, नीलम जाधव, अनुराधा गोसावी, दीपा ठाणेकर, दीपाली शेटे, मंगल गुरव, ऊर्मिला ठाणेकर, अनिश पोतदार, संतोष जोशी, संतोष कदम, सतीश नानेगावकर, सागर जाधव, मैंदरगीकर उपस्थित होते.

- फोटो नंतर देतोय - भारत चव्हाण

Web Title: Water problem in Tarabai Road area is serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.