नदीतील प्रदूषित पाण्याचा प्रशासनाकडून पंचनामा
By Admin | Updated: August 22, 2014 22:05 IST2014-08-22T21:17:26+5:302014-08-22T22:05:25+5:30
पंचायत सदस्य प्रसाद धर्माधिकारी यांनी दिली माहिती

नदीतील प्रदूषित पाण्याचा प्रशासनाकडून पंचनामा
शिरोळ : कृष्णा-पंचगगा नद्यांच्या प्रदूषणप्रश्नी गांधारी आंदोलनानंतर प्रशासनाने दखल घेऊन नदीत मिसळणाऱ्या प्रदूषित पाण्याचा पंचनामा केला आहे. विना प्रक्रिया थेट नदीत आईल मिश्रित दूषित पाणी जात असल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती ग्राम पंचायत सदस्य प्रसाद धर्माधिकारी यांनी दिली.
शिरोळ तालुक्यातील पंचगंगा-कृष्णा नद्यांचा प्रदूषित प्रश्न उच्च न्यायालयाने स्वतंत्रपणे अहवाल सादर करण्यास आदेश देऊनही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शासन दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ शिरोळ येथील ताराराणी आघाडी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी डोळ्याला काळी पट्टी बांधून गांधारी आंदोलन केले होते.
या आंदोलनाची दखल घेऊन तहसीलदार सचिन गिरी यांनी मंडल अधिकारी डी. एम. सानप, गावकामगार तलाठी स्वप्निल घाटगे, कोतवाल सुकुमार गडकरी यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले. ल. क. अकिवाटे वसाहतीतून विना प्रक्रिया दूषित पाणी रस्त्यावरून नदीत मिसळत असल्याचे पंचनाम्यामध्ये दिसून आले आहे. त्यामुळे आता प्रशासनाने गांधारीची भूमिका न घेता योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी धर्माधिकारी यांनी केली आहे. (प्रतिनिधी)