पाण्यासाठी पाचगावकर रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2015 00:44 IST2015-12-29T00:14:21+5:302015-12-29T00:44:59+5:30
शिवसेनेचे आंदोलन : जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; महिलांचा लक्षणीय सहभाग

पाण्यासाठी पाचगावकर रस्त्यावर
पाचगाव : गेल्या पंधरा वर्षांपासून पाचगाव व उपनगरांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी पाचगाव ग्रामपंचायत कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय, असा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात पाचगावच्या नागरिकांसह महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
सकाळी दहा वाजता पाचगाव ग्रामपंचायतीपासून पायी मोर्चाला सुरुवात झाली. महिला रिकाम्या घागर, बादल्या डोक्यावर घेऊनच सहभागी झाल्या होत्या. ‘पाणी नको विष द्या’ असे घोषणा फलकही महिलांनी आणले होते. सुमारे १२ किलोमिटरचा पायी दोन तास प्रवास करीत हजारो मोर्चेकऱ्यांनी पाणी प्रश्नावर घोषणा देत जिल्ह्याधिकाऱ्यांकडे दाद मागितली.
यावेळी संजय पवार यांनी शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याशी चर्चा केली. राजकीय श्रेयवादासाठी पाचगावकरांना पाण्याची ढाल न बनविता जनतेला लवकरात लवकर पाणी मिळावे, हा त्यामागचा उद्देश घेऊन शिवसेना प्रामाणिकपणे लढत असल्याचे सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करून पाणीपुरवठा योजनेसाठी निधी तातडीने मंजूर करून घेतल्यास केवळ दोनच महिन्यांत पाचगावचा पाणीप्रश्न निकालात निघेल, असे पवार यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, आतापर्यंत पाचगावसाठी आम्ही सर्वतोपरी मदत केली आहे. पाण्यासाठी लागणारा निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग केला असून, पाचगावसाठी अजून काही लागणार असेल, तर आमची मदत करण्याची तयारी आहे. या अगोदर आम्ही कार्यकारी अभियंता व ठेकेदार यांच्याशी चर्चा करून लागणाऱ्या निधीसाठी विचारपूस केली आहे; परंतु जीवन प्राधिकरणाच्या पाणी योजनेची मुदत जून २0१६ पर्यंत असल्याने त्यासाठी एप्रिलपर्यंत वेळ लागू शकतो; परंतु आपल्या मागणीनुसार आम्ही येत्या ३१ डिसेंबरला जीवन प्राधिकरण व पाणी योजना संबंधातील सर्वांना एकत्र बोलावून, सभा घेऊन उपाययोजना म्हणून दहा लाखांची तात्पुरती पाणीयोजना मार्गी लावून पाठपुरावा करण्यात येईल. पाचगावसाठी खास कोट्यातून निधी आणण्यावर चर्चा करण्यात येईल. आणखीन काहीतरी अधिग्रहण करीत पाण्याची उपलब्धता करून देण्यात येईल. महानगरपालिकेकडून पाण्याची उपाययोजना करून त्यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल.
कार्यकारी अभियंता एस. एस. शिंदे यांनी सांगितले की, नऊ कूपनलिका अधिग्रहण काराव्यात, असे ग्रामपंचायतीला कळवून पत्राद्वारे आदेश दिले आहेत; परंतु त्यापैकी दोन कूपनलिकांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. उर्वरित कूपनलिका अधिग्रहित करून दिल्या जातील. त्यासाठी सत्ताधारी मंडळींनी थोडी मदत करणे गरजेचे आहे, असे सांगताच सैनी यांनी सांगितले की, सरपंच जर मदत करीत नसतील, तर त्यांना बोलावून कायदा सांगावा.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विराज पाटील, पाचगाव शाखेचे आदित्य शेळके, दिगंबर पाटील, विकी काटकर, रितेश डोकरे, सागर पंतोडी, मेघाताई पाटील, आशा पिसाळ, गीता जोशी, सुवर्णा मिठारी तसेच नागरिक व महिला उपस्थित होते.
मोर्चातील मागण्या...
पाणीप्रश्नावर तात्पुरती मलमपट्टी न करता कायमचा तोडगा काढावा.
पुढील १५ ते २0 वर्षांतील लोकसंख्येचा विचार करून योजना राबवावी.
थेटपाईपलाईन योजनेतील पाणी काही प्रमाणात पाचगावमधील जनतेला पुरवठा करता येईल, याबाबतचा सर्व्हे प्रशासनाने करावा.
सध्या पाचगावमध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत सहा कोटी रुपयांच्या जीवन प्राधिकरणाच्या नळ पाणीपुरवठा योजनेचे ६0 टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामासाठी केवळ तीन कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय पातळीवर ही पाणी योजना पूर्ण होण्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी लवकरात लवकर द्यावा.