रात्रभर वाहतात पाण्याचे लोट
By Admin | Updated: November 30, 2014 23:56 IST2014-11-30T23:30:02+5:302014-11-30T23:56:42+5:30
शहरात पाण्याचा अपव्यय : ना महापालिकेला जाणीव, ना नागरिकांत जागरूकता

रात्रभर वाहतात पाण्याचे लोट
गणेश शिंदे - कोल्हापूर -कोल्हापूर शहरात पाण्याची प्रचंड उपलब्धता असतानाही केवळ निकृष्ट यंत्रणा व पाणी बचतीबाबत जनजागृतीचा अभावामुळे रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.
शहरात एकूण एक लाख सहा हजार पाणी कनेक्शन आहेत. त्यापैकी घरगुती एक लाख दोन हजार, औद्योगिक बाराशे तर व्यावसायीक दोन हजार कनेक्शन आहेत. महापालिकेला शिंगणापूर योजनेतून रोज १२० एमएलडी (म्हणजे १२ कोटी लिटर) पाणी उपसा होते. त्यातील शहराला सुमारे ८५ एमएलडी पाण्याचा वापर होतो. त्यातील हजारो लिटर पाणी घरगुती नळ बंद नसल्याने तर कांही नळांच्या चाव्याच गायब असल्याने वाया जाते. तर जलवाहिनीच्या एअर व्हॉल्व्हमधूनही मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. यामुळे सांडपाण्याचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे.
‘गळक्या’ योजनेचा हातभार
शिंगणापूर योजनेमधून शहराला पाणी येते; पण महिन्यातून एकदा तरी या गळक्या योजनेला महापालिकेला सामोरे जावे लागते. कधी व्हॉल्व्हचे काम, तर कधी पाणी उपसा केंद्रातील गाळ काढण्याचे काम, अशी कारणे आहेत. त्यासाठी प्रशासन पैसे खर्च करते; पण हा पैसा पाण्यासारखा वाहून जातो.
ग्राहकांनी नळाला उच्च दर्जाच्या चाव्या बसवाव्यात. जेणेकरून पाण्याच्या अपव्ययाचा भुर्दंड त्यांना बसणार नाही.
- मनीष पवार, जलअभियंता, महापालिका
पहाटे पाणी आल्यानंतर तातडीने उठून चावी बंद करण्याची तसदी लोक घेत नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी घरगुती चाव्यांचे पाणीही वाहत असते. वृत्तपत्र विक्रेते पहाटे अनेक ठिकाणी रोज हे नळ बंद करतात; परंतु दुसऱ्या दिवशीही तीच परिस्थीती असते.
- किरण व्हनगुत्ते,
ज्येष्ठ वृत्तपत्र विके्रते, कोल्हापूर.
वृत्तपत्र विक्रेते, ज्येष्ठ नागरिकांची मदत
शहरात सुमारे एक लाख २६ हजार मिळकतधारक आहेत. त्यांतील एक लाख सहा हजार हजार नळ कनेक्शन आहेत. मात्र, या नळाच्या तोट्या कधी गायब, तर कधी नळ अखंडपणे सुरू असतात. रात्री दोन वाजल्यापासून पाणी सुरू होते; ते सकाळी सहा वाजेपर्यंत तसेच वाहून जाते. याचवेळी प्रत्येकाच्या घरोघरी वृत्तपत्र टाकणारे विक्रेते, सकाळी फिरण्यासाठी जाणारे ज्येष्ठ नागरिक या सुरू असलेल्या चाव्या बंद करून पाण्याचा अपव्यय टाळताना दिसतात.