कळंबा तलावाची पाणीपातळी बावीस फुटांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:16 IST2021-06-20T04:16:56+5:302021-06-20T04:16:56+5:30
कळंबा : उपनगरे व लगतच्या ग्रामीण भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत असणाऱ्या कळंबा तलावातील पाणीपातळीमध्ये झपाट्याने वाढ होत ...

कळंबा तलावाची पाणीपातळी बावीस फुटांवर
कळंबा : उपनगरे व लगतच्या ग्रामीण भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत असणाऱ्या कळंबा तलावातील पाणीपातळीमध्ये झपाट्याने वाढ होत असून, अवघ्या चोवीस तासांत पंधरा फुटांवर असणारी पाणीपातळी बावीस फुटांवर जाऊन पोहोचली आहे. तलावाची पाणीपातळी सत्तावीस फुटांवर पोहोचली की, तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून ओसंडून वाहतो. पर्यटकांच्या नजरा आता तलाव सांडव्यावरून कधी ओसंडून वाहतो, याकडे लागल्या आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात तलावात केवळ साडेअकरा फूट मृत पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे कळंबा गावात एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, गत आठवड्यात सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे तलावाचे मुख्य जलस्त्रोत कात्यायनी टेकड्यांतून वाहणारे सात नैसर्गिक नाले पूर्ण क्षमतेने वाहू लागल्यामुळे बारा फुटांवर असणारी पाणीपातळी बावीस फुटांवर पोहोचल्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
चौकट : काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
सांडव्यानजीकचा पूल धोकादायक बनला असून, तलाव सांडव्यावरून ओसंडून वाहताच मासेमारी व पोहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी उसळते. ज्यामुळे वाहतूक कोंडी होते. येथे पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने गतवर्षी दोन युवक वाहून गेले होते. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. तर कळंबा पाचगावकडे जाणार पूल व चार म्हशी गतवर्षी वाहून गेल्या होत्या. त्यामुळे तलाव सांडवा आणि मनोरा परिसरात पर्यटकांनी हुल्लडबाज करू नये. योग्य काळजी घेण्याचे आवाहन पालिका व कळंबा ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
फोटो : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असणाऱ्या दमदार पावसामुळे कळंबा तलावाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊन पाणीपातळी बावीस फुटांवर पोहोचली आहे. पाणीपातळी सत्तावीस फुटांवर पोहोचली की तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून ओसंडून वाहतो.