गगनबावडा, कागल, भुदरगडमधील पाणीपातळी घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:52 IST2020-12-05T04:52:23+5:302020-12-05T04:52:23+5:30
राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : यंदा तीन महिने एकसारखा झालेला पाऊस, ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने झोडपल्याने कोल्हापूरच्या ...

गगनबावडा, कागल, भुदरगडमधील पाणीपातळी घटली
राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : यंदा तीन महिने एकसारखा झालेला पाऊस, ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने झोडपल्याने कोल्हापूरच्या पाणीपातळीत मागील पाच वर्षांच्या तुलनेत किंचितशी वाढ झाली आहे. गगनबावडा, कागल व भुदरगड तालुक्यांतील पातळीत मात्र घट झाली आहे. शिरोळच्या पातळी सर्वाधिक सव्वा फुटाने वाढ झाली. यंदा सरासरीपेक्षा जादा पाऊस होऊन पातळीत अपेक्षित वाढ दिसत नाही.
मागील दोन वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळला. एकसारखा तीन महिने पाऊस, सततची अतिवृष्टी आणि परतीचा पाऊस यामुळे यंदा जिल्ह्याने पावसाची सरासरी ओलांडली. जिल्ह्याची सरासरी १७७२ मिलिमीटर आहे. यावर्षी सरासरी १८२८.६९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सलग दोन वर्षे जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने पातळीत मोठी वाढ अपेक्षित होती. मात्र, जिल्ह्याच्या पातळीत मागील पाच वर्षांच्या तुलनेत सरासरी ०.०६ मीटर (०.१८ फूट)ची वाढ दिसते. भुदरगडची सरासरी पातळी २.५७ मीटर आहे, ती आता २.७० मीटरपर्यंत गेली असून, गगनबावड्याची ४.३६ची ४.५५ मीटरपर्यंत खाली गेली. कागलच्या पातळीतही ०.११ मीटरने घट झाली. उर्वरित तालुक्यात थोडी वाढ झाली असली तरी करवीर व शिरोळ तालुक्यांत पातळी झपाट्याने वाढली आहे.
अशी ठरविली जाते भूजल पातळी
पाणलोट क्षेत्रातील चढ, उतार आणि सखल भागातील तीन विहिरी निवडल्या जातात. जिल्ह्यात अशा ९९ विहिरी असून, त्यातून वर्षभरात ऑक्टोबर, जानेवारी, मार्च व मे महिना असे चार वेळा पाण्याच्या पातळीची मोजणी केली जाते.
तालुकानिहाय सरासरी व यंदा झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये -
तालुका सरासरी पाऊस यंदाचा पाऊस
हातकणंगले ८२०.४० ५६७.८८
शिरोळ ३८५.३० ४८८.००
पन्हाळा १४१६.२० १७३९
शाहूवाडी १५४२.३० १९३०.५०
राधानगरी ३५०१.६० २०८७.३३
गगनबावडा ५६२९.४० ५२३५.००
करवीर ७९६.९० १२१५.१८
कागल ६४९.६० १३४६.२९
गडहिंग्लज ७८४.६० १०३१.५७
भुदरगड १३४३.७० १५९२.२०
आजरा १७८९.७० २३७७.००
चंदगड २६०९.०० २३३४.३३
जानेवारीमधील सर्वेक्षणानुसार तालुकानिहाय भूजल पातळी मीटरमध्ये -
तालुका पाच वर्षांची सरासरी ऑक्टोबर २०२०
करवीर १.७३ १.४२
कागल १.३५ १.४६
पन्हाळा १.९० १.८२
शाहूवाडी ३.०० ३.१६
हातकणंगले २.०१ १.८९
शिरोळ २.४७ २.०६
राधानगरी १.२८ १.२६
गगनबावडा ४.३६ ४.५५
भुदरगड २.५७ २.७०
गडहिंग्लज १.७३ १.६३
आजरा २.०१ १.८९
चंदगड ४.५८ ४.४७