चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत लक्ष देणार
By Admin | Updated: December 11, 2015 00:48 IST2015-12-11T00:37:22+5:302015-12-11T00:48:50+5:30
महेश मांजरेकर : चित्रनगरीला ऊर्जितावस्था देऊ

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत लक्ष देणार
कोल्हापूर : मराठी चित्रपटांना आवश्यक त्या सुविधा शासनाकडून मिळविण्यासाठी चित्रपट दिग्दर्शक, कलाकार आदींचा दबावगट असणे गरजेचे आहे. चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून दबावगटाची निर्मिती शक्य आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत लक्ष देणार असल्याचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी गुरुवारी येथे पत्रकारांना सांगितले.मांजरेकर म्हणाले, मराठी चित्रपट सातासमुद्रापार गेला आहे. त्याला आणखी मोठे करणे आवश्यक आहे. शासनाकडून मराठी चित्रपटांना आवश्यक सुविधा मिळविण्यासाठी दबावगट तयार करणे आवश्यक आहे. ते अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून शक्य आहे; पण, त्यासाठी महामंडळात दूरदृष्टी असणाऱ्या तरुण संचालकांची गरज आहे. महामंडळाचे कार्यालय मुंबई की कोल्हापूर असा वाद घालणे अयोग्य आहे. ते कोल्हापुरात असले पाहिजे. अन्य ठिकाणांपेक्षा सर्वच पातळीवर कोल्हापुरात चित्रीकरण करणे निर्मात्यांना सोयीस्कर ठरते. भविष्यात ते अधिक सोयीस्कर ठरणार आहे. कोल्हापुरच्या चित्रनगरीला ऊर्जितावस्था देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. चित्रनगरीतील विविध कामांसाठी १५ कोटी रुपयांची निविदा मंजूर झाली असून, लवकरच ही कामे सुरू होतील. शासनासह चित्रनगरीसाठी या क्षेत्रातील सर्वांच्या सहकार्यातून प्रयत्न करणार आहे.
शेतकऱ्यांच्या टोपीकडे लक्ष दिले का?--‘नटसम्राट’ चित्रपटात नाना पाटेकर यांच्या डोक्यावर काळी टोपी असून ती एका विशिष्ट संघटनेचा प्रचार करणारी असल्याची टीका होत असल्याचे अभिनेते नाना पाटेकर व दिग्दर्शक मांजरेकर यांना पत्रकारांनी विचारले. त्यावर महाराष्ट्रातील शेतकरीदेखील टोपी वापरतात; पण त्यांच्या टोपीचा रंग कोणता आणि कसा झाला आहे. त्यांच्या अवस्थेकडे कुणी लक्ष दिले का? असा प्रतिप्रश्न अभिनेते पाटेकर यांनी केला. मांजरेकर म्हणाले, टोपीवरून कोणत्याही व्यक्तीची विचारसरणी ठरविता येत नाही. चित्रपटनिर्मितीत दिग्दर्शकाचे स्वातंत्र्य म्हणून नाना यांच्या डोक्यावर काळी टोपी दिसते. त्यातून कोणताही विचार, संघटनेचा प्रचार करण्याचा प्रश्नच नाही.