गडमुडशिंगीत गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया
By Admin | Updated: April 18, 2015 00:12 IST2015-04-17T21:38:09+5:302015-04-18T00:12:16+5:30
जीवन प्राधिकरणचे दुर्लक्ष : जिल्हा परिषद सदस्यांची सूचनाही हवेतच, पाणीटंचाईमुळे नागरिकांतून मात्र संताप

गडमुडशिंगीत गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया
गांधीनगर : महाराष्ट्रात पाणीटंचाईचे सावट आहे. पाण्याची कमतरता असली, तरी काही तांत्रिक बाबींमुळेही पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. गडमुडशिंगी (ता. करवीर)सह सात गावांतही हीच परिस्थिती आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाईपलाईनला गळती लागली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. तरीही प्रशासन गांधारीची भूमिका घेत आहे. यामुळे नागरिकांना पाणीटंचाई जाणवत असून, त्यांच्यातून संताप व्यक्त होत आहे.
गडमुडशिंगी, गांधीनगर, वसगडे, वळिवडे, चिंचवाड, न्यू वाडदे या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईन आहे. गडमुडशिंगी ते वसगडे या मुख्य रस्त्यावर महाराष्ट्र बँकेजवळच पाईप फुटल्याने दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना याबाबत कळवूनही अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा केला आहे. जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब माळी यांनीही ‘एमजीपी’च्या अधिकाऱ्यांना गळतीबाबत सांगितले; पण कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. स्थानिकांनी याबाबतची कल्पना देऊनही प्रशासकीय अधिकारी जबाबदारीने येऊन गळती काढण्यासाठी पुढे सरसावत नाहीत. त्यामुळे काही गावांना ऐन उन्हाळ््यात पाण्याची उपलब्धता असूनही पाणीटंचाईची झळ बसत आहे. अशा अनेक गळत्या जिल्ह्यातील काही योजनांना लागल्या आहेत. त्या जरी प्रशासनाने गांभीर्याने बंद केल्या, तर पाणीटंचाईवर थोडीफार मात करता येईल, हे उघड सत्य आहे; पण अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली पाहिजे, अशी भावना काही नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
या गळतीमुळे काही नागरिकांच्या घरात पाणी शिरत असून, याचा त्यांना त्रास सोसावा लागत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी ही गळती ताबडतोब काढण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.