जिल्ह्यात वळवाचा तडाखा

By Admin | Updated: April 12, 2015 00:50 IST2015-04-12T00:50:04+5:302015-04-12T00:50:04+5:30

कोल्हापुरात नागरिकांची तारांबळ : अनेक ठिकाणी छप्परे उडाली; सखल भागात पाणी साचले

Wasting of the district | जिल्ह्यात वळवाचा तडाखा

जिल्ह्यात वळवाचा तडाखा

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात शनिवारी दुपारी वळवाने हजेरी लावली. साधारणत: शहरात तासभर पाऊस झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. गेले चार-पाच दिवस उष्म्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना पावसाने दिलासा मिळाला असला तरी पावसाने वीट व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्याच्या काही भागातही वळवाने चांगलीच हजेरी लावली.
गेले चार-पाच दिवस वातावरणात कमालीचा उष्मा जाणवत होता. सकाळी आठ वाजताच कडाक्याच्या उन्हाचे चटके अंगाला बसायचे. दुपारी बारानंतर तर अंग करपणारे ऊन लागत होते; पण शुक्रवारी रात्रीपासून हवामानात एकदम बदल झाला. थंड वारे वाहू लागले. शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते.
दुपारी दोन वाजता पावसास सुरुवात झाली. सुमारे तासभर एकसारखा पाऊस राहिला. त्यानंतर थोडी उघडीप दिल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता पुन्हा जोरदार पाऊस कोसळला.
या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने थोडा दिलासा मिळाला असला तरी ग्रामीण भागात वीट व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. काकडी, दोडक्यावर किडीचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. ऊस, सूर्यफूल या पिकांना हा पाऊस पोषक आहे; तर खरीप पेरणीच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांना हा पाऊस उपयुक्त आहे.
लाटवडेत परिसरात पत्रे उडाले
खोची : लाटवडे परिसरात आज वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामध्ये अनेक ठिकाणी घरांची, पत्र्यांच्या शेडची पडझड झाली. विद्युत खांब कोसळले. झाडे उन्मळली, तसेच झाडांच्या फांद्याही तुटून पडल्या.
लाटवडे-वडगाव रस्त्याच्या मध्यावर असलेल्या ढोरवगळीत दोन्ही बाजूला असणाऱ्या झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
रुकडीत वीट भट्टींचे नुकसान
रुकडी : रुकडी (ता. हातकणंगले) परिसरात दुपारी दोन वाजता विजांच्या गडगडाटांसह सोसाट्याच्या वाऱ्याने जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पाऊस ऊस पिकासाठी वरदान ठरला आहे.
बांबवडे परिसरात झाडे कोसळली
बांबवडे : बांबवडे (ता. शाहूवाडी) परिसरात अवकाळी पावसाने घातलेल्या धुमाकुळात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली आहेत.पावसाने सलग दोन दिवस धुमाकूळ घातला असून, शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पावसाने सुरुवात केली. शाळू पीक अगोदरच शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे.
इचलकरंजीत वळवाने उडाली दाणादाण
इचलकरंजी : इचलकरंजी शहराच्या पश्चिम भागात ढग दाटून येऊन मेघगर्जनेसह पावसानं हजेरी लावली. त्यामुळे कबनूरसह परिसरातील ओढे, नाले तुडूंब भरून वाहत होते. शहर परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरात ठिकठिकाणी विद्युत खांब पडले असून, ट्रान्स्फार्मरही जळले. तसेच डिजीटल फलकाचे खांबही अनेक ठिकाणी पडले होते. सायंकाळपर्यंत तुरळक पाऊस आणि शहरात ढगाळ वातावरणामुळे गारवा जाणवत होता. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ढग दाटून सोसाट्याचा वारा सुरू झाला होता. वाऱ्यामुळे षटकोन चौकातील विद्युत ट्रान्स्फॉर्मरही जळला. राजाराम मैदान, जलशुद्धीकरण केंद्र परिसरातील शहरात ठिकठिकाणी असलेल्या मोठ्या डिजीटल फलकाचे खांबही पडले होते. त्यामुळे शहरातील बहुतांश भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. वारा थांबून काळ्या ढगांमुळे मेघगर्जनाही सुरू झाल्या. परंतु केवळ ढगाळ वातावरण होऊन पावसाचे तुरळक थेंब पडले. मात्र, इचलकरंजी शहराच्या पश्चिमेस कबनूर, रुई, साजणी, तिळवणी गावात सुमारे दोन तास वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं गोंधळ माजला होता. पावसामुळे घरांबरोबरच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. साजणीतील मानसिंग कोळी यांच्या गोठ्याचे सिमेंट पत्र्याचे छत उडून पडले. तसेच शहापूर, तोरणानगर, आर. के. नगर, सांगली रोड परिसरात झाडे पडून विजेच्या तारा तुटल्या.

Web Title: Wasting of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.