पाचगावच्या शाळेतील झाडांना सांडपाण्याचे सिंचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2016 00:46 IST2016-06-06T00:34:06+5:302016-06-06T00:46:05+5:30
पर्यावरण रक्षणाचे धडे : विद्यार्थीच बनले जलमित्र, पाण्याच्या पुनर्वापरावर भर

पाचगावच्या शाळेतील झाडांना सांडपाण्याचे सिंचन
संदीप आडनाईक--कोल्हापूर कळंबा व पाचगावच्या मध्यावर असणाऱ्या माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक मिलिंद कोपार्डेकर यांच्या प्रोत्साहनातून शाळेच्या परिसरातील झाडांना विद्यार्थ्यांच्या एका चमूने चक्क सांडपाण्याचे सिंचन करून ही झाडे जगविण्याचा आटापिटा सुरू केला आहे. या प्रयत्नातून या गटाने आगळ्यावेगळ्या जलचळवळीत स्वत:ला झोकून दिले आहे. हा गट गिरगावातील एका टेकडीवरील झाडांनाही पाणी देण्याचे काम करत खऱ्या अर्थाने जलमित्र बनला आहे.
कळंबा परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागल्यानंतर तीन वर्षांपूर्वीच शाळेतील झाडांना पाणी देण्याबाबत त्यांनी विचार सुरू केला. एका रविवारी त्यांनी विद्यार्थ्यांना कळंबा तलावातून बादलीने पाणी आणण्याची कल्पना मांडली. तेव्हा आठवीतील विद्यार्थ्यांनी खांद्यावरुन घागरीने तसेच बादलीने एकमेकांच्या साखळीद्वारे हे पाणी झाडांना घालण्यात आले. तेव्हापासून या विद्यार्थ्यांचे हे मिशन बनले. आजही हा उपक्रम अव्याहतपणे सुरु आहे. दहावीत असणारे हे विद्यार्थी या जलचळवळीचा भाग बनले आहेत. विद्यार्थी जेवल्यानंतर एका बादलीत हात धुतात, तेच पाणी झाडांना घालतात. हा प्रयोग ते घरीही करुन पाणी वाचवू लागले. २0१२ मध्ये शाळेचा नादुरुस्त बोअर दुरुस्त करुन त्याचे पाणी झाडांना देवू लागले. आज त्याचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे पुन्हा कोपार्डेकर यांनी एका घरातील वाया जाणारे सांडपाणी झाडांना देण्याची कल्पना मांडली. शिपाई शंकर पुनपाळ यांच्या मदतीने व मुख्याध्यापक व्ही. बी. ठाकूर यांच्या प्रोत्साहनातून या घरातील सांडपाणी एका तीन बाय तीन बाय तीनच्या खडड्यात साठविण्यात आले. त्यानंतर कोळसा, खडी व पिंजर वापरुन हे सांडपाणी दुसऱ्या खड्यात सोडण्यात आले. सांडपाणी असल्यामुळे विद्यार्थी हातमोजे घालून हे पाणी झाडांना देतात. रोेज ४५ बादल्या पाणी १0 ते १५ झाडांना घालण्यात येते.
कोपार्डेकर सरांची प्रेरणा --कळंबा-पाचगाव येथील माध्यमिक विद्यालयात मिलिंद कोपार्डेकर हे २00८ पासून शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. इतिहास, भूगोल आणि सामाजिक शास्त्र हे त्यांच्या अध्ययनाचे विषय, परंतु चाकोरीबाहेर जाऊन त्यांनी शाळेत अनेक सामाजिक उपक्रम सुरू केले आहेत. त्यात सहकारी शिक्षक, शिपाईही सहभागी झाले आहेत. चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीमध्येही ते सहभागी आहेत. या चळवळीत ते केवळ सहभागी नाहीत, तर शाळेत त्यांनी हा उपक्रम स्वतंत्रपणे सुरू केला आहे.
पंधरा विद्यार्थ्यांचा वसा -दहावीमधील १0 ते १५ विद्यार्थ्यांचा हा गट गेली तीन वर्षे या परिसरातील झाडांना पाणी घालण्याचे काम करत आहे. निखिल जाधव, प्रथमेश आवळे, ओंकार कुंभार, रत्नम उसूळकर, कार्तिक रेडेकर, आदर्श कडोलकर, आदित्य पानगळे, सिद्धार्थ वाघमारे, प्रेम पाटील, आदींचा हा गट जलचळवळीसाठी कार्यरत आहे. त्यांना शिक्षक दीपक कांबळे, सुलभा आलेकर, वैशाली साळोखे, लक्ष्मण लोहार, प्रकाश पाटील, रमेश गुरव यांच्यासह कर्मचाऱ्यांचे सहकार्य असते. गिरगावाताील एका टेकडीवर एका संस्थेने काही वर्षांपूर्वी झाडे लावली, पण त्याला हेच विद्यार्थी पाणी देत आहेत. शिवाय परिसरातील पाचशे झाडांना ते दररोज पाणी देत आहेत. कळंबा तलावातील जलचर सर्वेक्षणही याच गटाने केले होत. मिलिंद यादव यांच्या चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीशी हे विद्यार्थी संबंधित आहेत.