जत तालुक्यातील खरीप हंगाम वाया
By Admin | Updated: July 19, 2015 23:35 IST2015-07-19T23:17:34+5:302015-07-19T23:35:26+5:30
शेतकरी हवालदिल : पावसाअभावी दुष्काळाची छाया गडद

जत तालुक्यातील खरीप हंगाम वाया
भागवत काटकर-शेगाव -जत तालुक्यात पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप हंगाम पूर्णत: वाया जाण्याच्या मार्गावर आहे. आता दुबार पेरण्याही होणे शक्य होणार नाही. पिण्याच्या पाण्याची टंचाई, चाराटंचाई व पिकांचे नुकसान अशा तिहेरी संकटात जत तालुक्यातील शेतकरी सापडला आहे. पावसाने आणखी ओढ दिल्यास दुष्काळाची छाया गडद होणार आहे.
जत तालुक्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांनी बाजरी, मका, मूग, भुईमूग, उडीद, तूर, सूर्यफुल आदी पिकांची लागवड केली आहे. एकूण तालुक्यात ६४ हजार हेक्टर क्षेत्र खरिपाचे असून, पैकी २४ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. या खरीप हंगामातील कडधान्यांच्या उत्पन्नातून शेतकऱ्यांना थोडेफार आर्थिक सहाय्य मिळते. मात्र पावसाच्या ओढीने व वाढते तापमान यामुळे पिकांची हानी होत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी तालुक्यात टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दिवसभर ढगाळ वातावरण व रात्री थंड हवा, अशा विचित्र हवामानामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने पशुधन कसे वाचवायचे, या चिंतेत पशुपालक शेतकरी आहेत. पावसाने ओढ दिल्याने ज्वारीचा कडबा शेकडा ८०० रूपयांवरून १८०० ते २००० रूपये झाला आहे. ज्वारीच्या एका पेंडीचा दर १८ ते २० रूपयांपर्यंत झाला आहे. जनावरे जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड चालू आहे. शिवाय ऊस दर २५०० ते २८०० रुपये टनापर्यंत पोहोचला आहे.
शेतीपूरक व्यवसायाला जोड म्हणून शेतकऱ्यांनी जनावरांची जोपासना मोठ्या प्रमाणात केली आहे. तालुक्यात एकूण जनावरांची संख्या ६ लाख १० हजार ६०५ इतकी आहे. जनावरे शेळ्या, मेंढ्या जगविण्यासाठी पाणी व चाराटंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यात हवामान विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत केंद्रीय कृ षिमंत्री राधामोहन सिंह यांनी कमी पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना डिझेल, बियाणे व विजेसाठी अनुदान देऊ, असे जाहीर केले होते. बियाणांवर ५० टक्के अनुुदान व शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज दिली जाईल, असेही जाहीर केले होते. त्याचा पाठपुरावा खा. संजय पाटील यांनी करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.