हजारो लिटर पाणी वाया

By Admin | Updated: November 9, 2014 01:37 IST2014-11-09T01:00:37+5:302014-11-09T01:37:43+5:30

पाणी गळती : मोरेवाडी-कंदलगाव, चित्रनगरी परिसरात पाण्याचा तुटवडा

Waste thousands of liters of water | हजारो लिटर पाणी वाया

हजारो लिटर पाणी वाया

 पाचगाव : मोरेवाडी-कंदलगांव
(ता. करवीर) येथील कोल्हापूर चित्रनगरीच्या रस्त्यावरील मुख्य जलवाहिनीला आज, शनिवारी मोठी गळती लागली. या गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया गेले. त्याचा परिणाम येथील जलकुंभावर झाला आहे. त्यामुळे या परिसरातील उपनगरांतील नागरिकांना कमी व अपुऱ्या दाबाने पाणी मिळणार आहे.
कोल्हापूर चित्रनगरी येथील जलकुंभ (पाण्याची टाकी) क्षमता ही २२ लाख ५० हजार लिटर इतकी आहे. या टाकीमुळे परिसरातील वैभव हाउसिंग सोसायटीसह म्हाडा कॉलनी, आर. के.नगर, मोरेवाडी, आदी परिसराला नागरिकांना रोज सकाळी व सायंकाळी या वेळेत प्रत्येकी दोन तास पाणी मिळते. आज, शनिवारी दुपारी चित्रनगरी रस्त्याच्या जलवाहिनीला गळती लागली. त्यामधून हजारो लिटर पाणी वाया गेले. याचा परिणाम ही टाकी पूर्ण भरण्याच्या क्षमतेवर झाला. त्यामुळे उद्या, रविवारी नागरिकांना पाणीटंचाई भासणार आहे. दरम्यान, महापालिका प्रशासन सोमवार
(दि. १०) या जलवाहिनीचे काम सुरू करण्याची शक्यता आहे.
गावाशेजारी असणाऱ्या अनेक कॉलन्यांमध्ये जलवाहिनीची गळती दिवसेंदिवस वाढत असून, या गळतीमुळे स्थानिक नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. काहीवेळा या गळतीच्या खड्ड्यांतूनच नागरिकांना आपली तहान भागवावी लागत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
आर. के. नगर परिसरात अशा प्रकारची १३ ते १४ ठिकाणी गळती असून, या गळतीमधून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. या वाया जात असलेल्या पाण्याबद्दल पाणीपुरवठा कर्मचारी व अधिकाऱ्यांना अनेकवेळा तोंडी सूचना देऊनसुद्धा याकडे दुर्लक्ष केले आहे. या गळतीकडे संबंधित अधिकाऱ्यांनी जर एका आठवड्यात लक्ष दिले नाही, तर ग्रामपंचायतीमार्फत आंदोलनाचा इशारा ग्रामपंचायत सदस्य हेमंत नाईक यांनी दिला आहे. (वार्ताहर)

Web Title: Waste thousands of liters of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.