कोल्हापुरात रोडरोमिओंची धुलाई
By Admin | Updated: July 17, 2015 01:07 IST2015-07-17T01:00:35+5:302015-07-17T01:07:31+5:30
पोलिसांची धडक मोहीम : महाविद्यालय परिसरात ७७ जणांवर कारवाई

कोल्हापुरात रोडरोमिओंची धुलाई
कोल्हापूर : शहरातील विवेकानंद महाविद्यालयासह अन्य शाळा, कॉलेज, होस्टेल आवारातील रोड-रोमिओंची शाहूपुरी पोलिसांनी चांगलीच धुलाई केली. अचानक झालेल्या कारवाईमुळे या परिसरात उभे असलेले तरुण सैरावैरा पळत सुटले. यावेळी सुमारे ७७ जणांवर कारवाई करण्यात आली. ही मोहीम गुरुवारी दुपारी बारा ते दोन या वेळेत राबविण्यात आली. दरम्यान, ही धडक मोहीम शहरातील अन्य महाविद्यालयांच्या परिसरात ज्या-त्या पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी राबविणार आहेत.
‘कॉलेज म्हणजे टाइमपास’ असा नवीन फंडा रुजविण्याचा प्रयत्न शहरामधील महाविद्यालयांतील काही तरुणांकडून होत आहे. ग्रुपचे वर्चस्व, तरुणींच्या छेडछाडीचे प्रकार यावरून तरुणांत होत असलेल्या हाणामारीमुळे महाविद्यालयातील शैक्षणिक पावित्र्य नष्ट होत चालले आहे. शहरातील बहुतांश महाविद्यालये सकाळी सात ते दुपारी बारापर्यंत सुरू असतात. दरम्यान, या वेळेत तरुण क्लासरूममध्ये न बसता बाहेर कट्ट्यावर, कॅम्पसमध्ये बसून टिंगलटवाळी करीत असतात. पालकांनी केलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत अशा तरुणांना ‘धरा आणि ठोका’ असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी पोलिसांना दिले. त्यानुसार शाहूपुरी पोलिसांनी विवेकानंद कॉलेजसह ताराबाई पार्क, नागाळा पार्क, विचारेमाळ, सदर बझार परिसरातील शाळा, कॉलेज, विद्यार्थिनी वसतिगृह परिसरात फेरफटका मारला. शाळा, कॉलेजसह वसतिगृहाच्या आवारात दुचाकी फिरविणाऱ्या, ग्रुपने टिंगल-टवाळी करणाऱ्या तरुणांकडे चौकशी करीत त्यांची धुलाई करण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांसह काही पोलीस साध्या वेशात असल्याने तरुण बेसावध राहिले. हातात सापडेल त्याला पोलिसी खाक्या दाखविण्यात आला. त्यानंतर भर रस्त्यावर बैठका (उठाबशा) काढण्यास भाग पाडले. यावेळी काही तरुणांनी हात जोडून पोलिसांना कारवाई न करण्यासाठी विनंती केली. ४० तरुण, तर ३७ दुचाकीचालकांवर अशा सुमारे ७७ रोड-रोमिओंवर मुंबई पोलीस कायदा (११०/७) नुसार सार्वजनिक ठिकाणी गोंगाट करणे, शांततेला बाधा आणणे या कलमाखाली कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक विलास भोसले यांच्यासह बीट मार्शल व गुन्हे शाखेच्या पथकाने केली. (प्रतिनिधी)