वारणेने थकीत ऊस बिलाची रक्कम त्वरित द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:18 IST2021-07-04T04:18:08+5:302021-07-04T04:18:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वारणानगर : तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याने सन २०२०- २१ मध्ये गाळप झालेल्या उसाच्या थकीत बिलाची ...

वारणेने थकीत ऊस बिलाची रक्कम त्वरित द्यावी
लोकमत न्यूज नेटवर्क
वारणानगर : तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याने सन २०२०- २१ मध्ये गाळप झालेल्या उसाच्या थकीत बिलाची रक्कम तातडीने द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली. शनिवारी वारणा साखर कारखान्यास संघटनेने निवेदन दिले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या निवडक कार्यकर्त्यांनी वारणा शेतकरी भवन येथे साखर कारखान्याचे सचिव बी.बी. दोशिंगे, मुख्य शेती अधिकारी प्रमोद पाटील यांना निवेदन दिले.
निवेदनात वारणा कारखान्याकडे गाळप झालेल्या उसाचे बिल थकल्यामुळे सर्व शेतकऱ्यांची सेवा सोसायटीची कर्जे थकीत झाली असून, त्यांना व्याज व दंडाच्या रकमेचा भुर्दंड बसला आहे. कोरोना महामारीमुळे शेतकरी अडचणीत असताना त्यांच्या हक्काचे पैसे कारखान्याने वेळेत दिलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन वारणा कारखाना व्यवस्थापनाने लवकरात लवकर थकीत ऊस बिले द्यावीत, अशी मागणी केली. याबाबत निर्णय न झाल्यास दि. १६ जुलैला आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
दरम्यान, कारखान्याचे कार्यकारी संचालक शहाजी भगत यांनी १५ जुलैपूर्वी उर्वरित सर्व उसाची बिले जमा करण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संपत पोवार, पन्हाळा तालुकाध्यक्ष अजित पाटील, वाळवा तालुका अध्यक्ष भागवत जाधव, सांगली जिल्हा युवा अध्यक्ष संजय बेले, अण्णा मगदूम, सुधीर मगदूम, प्रकाश देसाई, प्रभाकर पाटील, सुरेश पचिंब्रे, दीपक सनदे यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
............................... फोटो ओळी - -वारणानगर येथे वारणा साखर कारखान्याने गाळप हंगामातील थकीत ऊस बिलाची रक्कम त्वरित द्यावी, या मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वारणा साखर कारखान्याचे सचिव बी.बी. दोशिंगे, मुख्य शेती अधिकारी प्रमोद पाटील यांच्याकडे दिले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वैभव कांबळे, महेश खराडे, संपत पोवार व कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो ०३ वारणा निवेदन