कोविड केंद्रातील अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी वॉर्डबॉयला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:17 IST2021-06-18T04:17:21+5:302021-06-18T04:17:21+5:30
कोल्हापूर : महापालिकेतर्फे चालविण्यात येणाऱ्या शिवाजी विद्यापीठात वसतिगृह नं. ३ मधील कोविड केंद्रामध्ये एका १७ वर्षांच्या अल्पवयीन निराधार मुलीवर ...

कोविड केंद्रातील अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी वॉर्डबॉयला अटक
कोल्हापूर : महापालिकेतर्फे चालविण्यात येणाऱ्या शिवाजी विद्यापीठात वसतिगृह नं. ३ मधील कोविड केंद्रामध्ये एका १७ वर्षांच्या अल्पवयीन निराधार मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तेथील कंत्राटी वॉर्डबॉयला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. अंकुश मच्छिंद्र पवार (वय २१, रा. तीन बत्ती चौक, दौलतनगर, राजारामपुरी, कोल्हापूर) असे त्या वॉर्डबॉयचे नाव आहे. त्याला न्यायालयाने दि.१९ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्याच्यावर बाललैंगिक प्रतिबंध कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा नोंदविला आहे.
अनाथ-निराधार मुलींचे संगोपन करणाऱ्या या संस्थेतील काही मुली कोरोना पॉझिटिव्ह आल्या. त्यांना पुढील उपचारासाठी महापालिकेतर्फे शिवाजी विद्यापीठात वसतिगृहातील कोविड केंद्रामध्ये उपचारास दाखल केले होते. त्याच केंद्रामध्ये कंत्राटी वॉर्डबाय अंकुश पवार हा सेवेस होता. पीडित मुलगी निराधार असल्याचा गैरफायदा घेऊन संबंधित वॉर्डबायने तिच्याशी संबंध वाढवले. स्वत:चे लग्न झालेले असताना ती माहिती लपवून त्याने तिला आपण अविवाहित असल्याचे खोटे सांगून पीडित मुलीवर अत्याचार केला. ही घटना २९ मे रोजी घडली होती. हा प्रकार बुधवारी उघडकीस आल्यानंतर संबंधित संस्थेतर्फे राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया राबवून संबंधित वॉर्डबॉय पंकज पवार याला गुरुवारी पहाटे अटक केली.
दरम्यान, लैंगिक अत्याचाराची घटना शिवाजी विद्यापीठाच्या ‘डीओटी’ कोविड सेंटरमध्ये घडली नाही. ‘लोकमत’मध्ये गुरुवारी असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांनी दिलेल्या खुलाशात म्हटले की, ‘डीओटी’तील केंद्र हे ३५० रुग्णांची व्यवस्था असणारे सर्वांत मोठे केंद्र आहे, आतापर्यंत तेथे तीन हजारांहून अधिक रुग्णांवर चांगले उपचार झाले आहेत. तेथील पूर्ण कर्मचारीवर्ग प्रामाणिक आहे.