प्रभाग आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
By Admin | Updated: January 16, 2015 23:41 IST2015-01-16T23:03:05+5:302015-01-16T23:41:01+5:30
शिरोळ मधील ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका : १३ फेब्रुवारीपर्यंत प्रभाग रचना पूर्ण होणार

प्रभाग आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेसह प्रभाग आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ही प्रक्रिया १३ फेब्रूवारीपर्यंत पार पडली जाणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या निमित्तने धुमशान पेटणार आहे. तालुक्यातील नृसिंहवाडी, बस्तवाड, शेडशाळ, गणेशवाडी, आलास, घोसरवाड, तेरवाड, बुबनाळ, मजरेवाडी, निमशिरगांव, उदगाव, तमदलगे, जैनापूर, शिरदवाड, गौरवाड, शिरटी, जुने दानवाड, कवठेगुलंद, हसूर, घालवाड, टाकळीवाडी, कुटवाड, अर्जुनवाड, चिपरी, नांदणी, यड्राव, धरणगुत्ती, कोंडिग्रे, कोथळी, दत्तवाड, जांभळी, दानोळी व शिरढोण अशा ३३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना व प्रभाग आरक्षण कार्यक्रम जाहीर झाला आहे. गुरूवार (दि. १५) पासून या प्रक्रियेला निवडणूक विभागाने सुरूवात केली असून २० जानेवारीला प्रभाग रचनेला अंतिम मान्यता, तर २८ जानेवारीला प्रभागांमध्ये वेगवेगळे आरक्षण टाकले जाणार आहेत. २९ जानेवारीपर्यंत आरक्षणावर हरकतीची मुदत असून १३ फेब्रुवारीला अंतिम आरक्षणाची यादी प्रसिद्धी केली जाणार आहे. निवडणुका मे की सप्टेंबर २०१५ मध्ये होणार याबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जात प्रमाणपत्र सादर करण्याची मुदतही संपलेली आहे. लोकसभा विधानसभेनंतर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या निवडणुका असणार आहेत. स्थानिक गटा-तटावरच होणाऱ्या या निवडणुकांचा राजकीय रंग कसा असणार याबाबतही उत्सुकता आतापासूनच लागून राहिली आहे. गोकुळ दूध संघ, जिल्हा मध्यवर्ती बॅँकांच्या निवडणुकीनंतरच या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होतील असेच संकेत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील राजकारणातील संदर्भ या निवडणुकीतही दिसून येणार आहे. (प्रतिनिधी)