प्रभाग निश्चिती, आरक्षण २८ ला?
By Admin | Updated: July 12, 2015 00:16 IST2015-07-12T00:14:45+5:302015-07-12T00:16:26+5:30
महापालिका निवडणूक : ८२ प्रभाग होणार; हरकतीसाठी दहा दिवसांचा कालावधी

प्रभाग निश्चिती, आरक्षण २८ ला?
कोल्हापूर : आॅक्टोबरमध्ये होत असलेल्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेले प्रभाग ज्या दिवशी जाहीर केले जाणार आहेत, त्याच दिवशी जाहीर सोडतीद्वारे त्या-त्या प्रभागातील आरक्षणही जाहीर करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर २८ किंवा २९ जुलै रोजी हे प्रभाग व आरक्षणाची सोडत होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेची प्रभाग रचना प्रत्येक दहा वर्षांनी बदलली जाते. यापूर्वी २००५ मध्ये प्रभाग रचना झाली होती; त्यामुळे यंदाची निवडणूक नवीन प्रभाग रचनेप्रमाणे होणार आहे. गतवेळच्या निवडणुकीत ७८ प्रभाग होते. त्यांत आता आणखी चार नवीन प्रभागांची वाढ होणार आहे. सध्या शहराची लोकसंख्या ५ लाख ४९ हजार २२३७ इतकी असून, कमीत कमी ६१००, तर जास्तीत जास्त ७००० लोकसंख्या गृहीत धरून प्रभाग तयार करण्यात आलेले आहेत. त्यामुळे एका प्रभागात सर्वसाधारण साडेपाच ते सहा हजार मतदारांचा समावेश असेल.
महानगरपालिकेने प्रभाग रचना तयार केली असून, त्याबाबतचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठविला आहे. पुढील आठवड्यात आयोगाकडून त्यावर मान्यतेची मोहोर उमटविली जाईल आणि जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. ज्या दिवशी प्रभाग रचना जाहीर करण्यात येईल त्याच दिवशी प्रभागावरील आरक्षणे सोडतीद्वारे निश्चित केली जाणार आहेत.
प्रभाग रचनेबाबत काही हरकती मागविण्यात येणार असून, त्यासाठी दहा दिवसांचा अवधी देण्यात येणार आहे.
ज्या दिवशी प्रभाग व आरक्षण निश्चित होईल, त्या दिवसापासून हालचाली गतिमान होतील. (प्रतिनिधी)