पदोन्नती पाहिजे, मात्र जबाबदारी नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:02 IST2021-01-13T05:02:15+5:302021-01-13T05:02:15+5:30
कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढीबरोबरच पदोन्नती देण्यात आली. मात्र, पदोन्नतीनुसार कामाची जबाबदारी नको आहे. कॅशिअर, शाखाधिकारी ...

पदोन्नती पाहिजे, मात्र जबाबदारी नको
कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढीबरोबरच पदोन्नती देण्यात आली. मात्र, पदोन्नतीनुसार कामाची जबाबदारी नको आहे. कॅशिअर, शाखाधिकारी म्हणून जबाबदारी घेण्यास तब्बल १२५ जणांनी असमर्थता दर्शवत आपापल्या संचालकांकडे धाव घेतल्याने पेच निर्माण झाला आहे.
जिल्हा बँकेचा कारभार मुख्य कार्यालयासह १९१ शाखांच्या माध्यमातून सुरू आहे. बँकेच्या आर्थिक स्थितीमुळे प्रशासक आले. त्यानंतर २०१५ ला संचालक मंडळ सत्तेवर आले. संचालक मंडळाने काटसकरीचा कारभार करत बँकेचा तोटा कमी करून नफ्यात आणले. काटकसरीचा भाग म्हणून खर्चिक निर्णय घेणे बँकेने टाळले. त्याचाच भाग म्हणून कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती थांबवल्या होत्या. गेल्या चार महिन्यांपासून युनियनने आग्रह धरल्यानंतर पदोन्नतीची प्रक्रिया सुरू झाली. सुमारे ४५० कर्मचाऱ्यांची चतुर्थमधून थर्ड ग्रेडमध्ये पदोन्नती देण्यात आली. मात्र, पदोन्नती देताना त्यानुसार काम करण्यास तयार असल्याचे संबंधित कर्मचाऱ्यांकडून लिहून घेतले आहे. पदोन्नतीबरोबर प्रत्येकाला ४२०० ते ५२०० रुपयांपर्यंत पगारवाढ देण्यात आली. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र, पदोन्नतीनुसार कामाची जबाबदारी स्वीकारण्यास १२५ कर्मचाऱ्यांनी असमर्थता दर्शवली आहे. काही कर्मचाऱ्यांनी संचालकांकडे धाव घेतल्याने त्यांचीही गोची झाली आहे.
बँकेची निवडणूक तोंडावर आहे, त्यात कर्मचाऱ्यांना दुखवणे काही संचालकांना अडचणीचे वाटू लागले आहे.
पन्नास कर्मचाऱ्यांनी पदोन्नतीच नाकारली
पदोन्नती घेतली तर जबाबदारी घ्यावी लागत असल्याने ५० कर्मचाऱ्यांनी पदोन्नती नाकारून चतुर्थमध्येच काम करण्याची तयारी दर्शवली आहे.