‘वॉल आॅफ चायना’ गौरवामुळे बदल--
By Admin | Updated: December 15, 2014 00:13 IST2014-12-15T00:06:02+5:302014-12-15T00:13:07+5:30
कोल्हापूरचा फुटबॉल...

‘वॉल आॅफ चायना’ गौरवामुळे बदल--
एकोणीसशे सत्तर साली गुजरात येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी माझी निवड शिवाजी विद्यापीठाच्या फुटबॉल संघात गोलरक्षक म्हणून झाली. ३ जून १९७० या दिवशी आमचा सामना जबलपूर विद्यापीठाशी होता. यात आमच्यासमोर तगडे, उंचेपुरे असे जबलपूरचे खेळाडू होते. मला नेहमीप्रमाणे फुटबॉल कधी माझ्या गोलक्षेत्रात येतो आणि मी तो झपकन कधी पकडतो असे झाले होते. या सामन्यात मी जबलपूरच्या आक्रमणाची धार बोथट केली होती. कोणताही आणि कसाही चेंडू माझ्या गोलजाळ्यात येऊ दे; मी तो अडवणारच या आत्मविश्वासाने तटवीत होतो. या सामन्यात अत्यंत तंत्रशुद्ध आणि खोलवर चढाया करण्यात जबलपूरचा संघ कुशल होता. त्यांनी अनेकवेळा आमच्यावर चढाया केल्या. मी मात्र त्यांचे गोल करण्याचे इरादे वारंवार फोल ठरविले. त्यामुळे आमच्या संघाने त्या टीमचा ४-१ असा लीलया पराभव केला. यात माझ्या गोलरक्षणाचा मोठा वाटा होता.
दुसऱ्या दिवशी एका इंग्रजी दैनिकाने मला ‘वॉल आॅफ चायना’ म्हणून गौरविले. हा सन्मान माझ्यासारख्या गोलरक्षकाला मोठा वाटला आणि पुढे या सामन्यामुळे माझ्यातील गोलरक्षक अखंडपणे वीस वर्षे कोल्हापूरच्या फुटबॉलमध्ये ‘पक्या रेडेकरची पकड’ म्हणून फुटबॉल शौकिनांच्या मनात घर करून राहिला... असे एक ना अनेक किस्से ‘आठवणीतील फुटबॉल’ सामन्याविषयी प्रॅक्टिस क्लबचे माजी गोलरक्षक प्रकाश रेडेकर सांगत होते.
स्थानिक सामन्यात शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस क्लब यांच्यात तीन दिवस एक सामना सुरू होता. या सामन्यात मला गोलरक्षण करण्याची संधी मिळाली. यामध्ये मी तीन पेनल्टी अडविल्या. सामन्यात विजय झाला. ‘बालगोपाल’चे रघू पिसे हे अत्यंत थंड डोक्याने गोल करीत. त्यामुळे त्यांचा गोल कसा अडवायचा, असा विचार त्याकाळी माझ्या मनात कायम यायचा. त्यांचा तंत्रशुद्ध खेळ आजही माझ्या मनात घर करून आहे. अशी खेळी मी आजही पाहिली नाही.
गडहिंग्लज येथे ‘मंड्या रेड मंड्या’ या कर्नाटकातील संघाविरुद्ध मी ‘पोल टू पोल डाय’ मारत चेंडू बाहेर काढला. रेफ्रीला वाटले गोल झाला. मात्र, समोरच्या संघातील कप्तानाने सांगितले, गोल बाहेर काढला आणि चांगले गोलरक्षण केले म्हणून माझी पाठ त्याने थोपटली.
-शब्दांकन : सचिन भोसले