शक्तिप्रदर्शन करीत निघाल्या पदयात्रा

By Admin | Updated: July 24, 2015 00:41 IST2015-07-23T21:38:27+5:302015-07-24T00:41:12+5:30

प्रचाराची सांगता : उमेदवारांनी शक्ती लावली पणाला

Walking Tours | शक्तिप्रदर्शन करीत निघाल्या पदयात्रा

शक्तिप्रदर्शन करीत निघाल्या पदयात्रा

आयुब मुल्ला -खोची -मतांची बेरीज पक्की करीत विजयासाठी आवश्यक असणारे समीकरण सोडविण्यासाठी उमेदवारांनी आपली शक्ती पणाला लावली आहे. यासाठी अद्यापही अळमडळम असणाऱ्या मतदारांना आपलसं करण्यासाठी सर्व नितीचा अवलंब करण्यास आज आणि उद्याचा दिवस उमेदवारांच्या हातात आहे. अशी काठावरची असणारी मते अन् त्या मतदारांचा भाव मात्र बहुमोल ठरू पाहत आहे. गुरुवारी प्रचाराची सांगता पदयात्रेने झाली. या पदयात्रेत कोण सामील होते हे पाहण्यासाठी परस्पर विरोधी उमेदवारांनी आपली यंत्रणा लावली होती. यातूनच वरील निष्कर्षापर्यंत पोहोचून उर्वरित मतदान आपलंसं करण्यासाठी उमेदवारांनी कंबर कसली आहे.
हातकणंगले तालुक्यातील सतरा गावांत काटाजोड लढती होत आहेत. जाहिरातबाजीपासून ते खिसा रिकामा होण्यापर्यंत उमेदवारांनी कसूर ठेवलेली नाही. सर्वसाधारण गटासाठी सरपंचपद असलेल्या गावांत तर कमालीची चुरस पाहावयास मिळत आहे. बुधवारी अर्थकारणाची चळवळ गावातील प्रभागनिहाय अगदी छुप्या पद्धतीने झालेली पाहावयास मिळाली. कितीच्या मोबदल्यात किती मते मिळतात याचा हिशेबही केला. यावरून तालुक्यातील शेकडो उमेदवारांनी आपला हात सैल सोडत मतदारांना मदत केली.
आज सकाळपासून पॅनेलनिहाय गावांतून प्रचाराची पदयात्रा निघाल्या. सायंकाळी चार वाजेपर्यंत जाहीर प्रचाराची मुदत होती. सर्वांनीच भव्य शक्तिप्रदर्शन करीत गाव पिंजून काढला. बोळ अन् बोळसुद्धा सोडली नाहीत. विजयाच्या घोषणा, नम्र अभिवादन करीत मतदान द्या, असे आवाहन या रॅलीद्वारे करण्यात आले. पॅनेलप्रमुख, आघाडीतील सदस्य, समर्थक, कार्यकर्ते रॅलीच्या माध्यमातून मतदारांसमोर गेले.
मतदारांनी मात्र, रॅलीचे स्वागत करीत समर्थन आहे, अशी पोझ दिली; परंतु या रॅलीत कोण आहे, हे पाहण्यासाठी प्रत्येकाने स्वतंत्र यंत्रणा लावली होती. रॅली झाल्यानंतर याचा सविस्तर अहवाल उमेदवारांसह पॅनेलप्रमुखांना मिळाला. तेव्हापासून पुढची दिशा ठरविण्यासाठी यंत्रणा सक्रिय झाली. जे कार्यकर्ते आजपर्यंत उघड प्रचारात नव्हते त्यांचेही गुरुवारी दर्शन झाले.
मतांची बेरीज करून विजयाची ठाम खात्री व्हावी, याचाही अंदाज बांधण्यास सुरुवात झाली. त्यामुळे काठावरच्या
म्हणजे अळमडळम मतदारांना आपल्याच समर्थनार्थ करण्यासाठी सायंकाळपासून सर्व प्रकारची यंत्रणा गतिमान झाली. शुक्रवारी रात्रीपर्यंत ती अधिक गतिमान होईल. गुरुवारी रॅलीने गावागावांत शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

Web Title: Walking Tours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.