शाहूकालीन खण प्रदूषणाच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:19 IST2021-01-08T05:19:02+5:302021-01-08T05:19:02+5:30

पट्टणकोडोली : परिसरातील गटारे, शौचालयांचे सांडपाणी व मोकाट डुक्करांचा वावर यामुळे पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील शाहूकालीन खणीच्या प्रदूषणात भर ...

In the wake of Shahu-era mine pollution | शाहूकालीन खण प्रदूषणाच्या विळख्यात

शाहूकालीन खण प्रदूषणाच्या विळख्यात

पट्टणकोडोली : परिसरातील गटारे, शौचालयांचे सांडपाणी व मोकाट डुक्करांचा वावर यामुळे पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील शाहूकालीन खणीच्या प्रदूषणात भर पडत आहे. सध्या डुक्करच खणीत मरत असल्याने खणीचे पाणी दूषित होऊन पाण्यावर हिरवा तवंग आल्याने उग्र वास सुटला आहे. त्यामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त होत असून, ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्नही यामुळे ऐरणीवर आला आहे. दरम्यान, खण प्रदूषित होऊ नये, यासाठी ग्रामपंचायतीने कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नसल्याने स्वच्छतेसाठी लाखो रुपये खर्च करुनही खण पुन्हा प्रदूषित झाली आहे. हे प्रदूषण थांबविण्यात ग्रामपंचायत प्रशासन असफल ठरल्याने या ऐतिहासिक खणीच्या प्रदूषणाचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. पट्टणकोडोली गावामध्ये मध्यवर्ती ठिकाणी पाण्याचा मुबलक साठा असणारी शाहूकालीन गावखण काही वर्षांपासून प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. या खणीच्या स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने यामध्ये परिसरातील ग्रामस्थ केरकचरा टाकत असून, गटारे व शौचालयांचे सांडपाणी राजरोसपणे थेट खणीच्या पाण्यामध्ये सोडण्यात येत आहे. खण परिसरात डुक्करांचा वावर वाढल्याने खण प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. खण स्वच्छ करण्यासाठी ग्रामपंचायतीने दोन वर्षांपूर्वी स्वच्छता मोहीम राबवली होती. यासाठी ग्रामपंचायतीने सुमारे दहा लाख रुपये खर्च केले होते. मात्र, ग्रामपंचायत प्रशासन खणीत मिसळणारे गटार, शौचालयांचे सांडपाणी व टाकण्यात येणारा केरकचरा थांबविण्यात अपयशी ठरली आहे. पाण्याला हिरवा तवंग येऊन उग्र वास सुटल्याने परिसरातील ग्रामस्थांना राहणेही मुश्कील बनले आहे. सध्या या खणीत एक मृत डुक्कर तरंगत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर याची चर्चा रंगली असून, ग्रामपंचायतीच्या कारभारावर बोट दाखवण्यात येत आहे. हा मेलेला डुक्कर काढून खणीचे प्रदूषण थांबविण्यासाठी ग्रामपंचायतीने उपाययोजना न केल्यास येथील मनसेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

फोटो ओळ : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील शाहूकालीन गावखण सांडपाणी व डुक्करांचा वावर यामुळे प्रदूषित बनली असून, पाण्यावर हिरवा तवंग येऊन उग्र वासही येत आहे. तर खणीतच डुक्कर मरून पडले आहे.

Web Title: In the wake of Shahu-era mine pollution