वजीर रेस्क्यू फोर्स मानधनाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:31 IST2021-09-08T04:31:34+5:302021-09-08T04:31:34+5:30
प्रशांत कोडणीकर नृसिंहवाडी : कोरोनाबरोबर महापूरकाळात प्रशासनाच्या मदतीला धावून गेलेली औरवाड (ता. शिरोळ) येथील वजीर ...

वजीर रेस्क्यू फोर्स मानधनाच्या प्रतीक्षेत
प्रशांत कोडणीकर
नृसिंहवाडी : कोरोनाबरोबर महापूरकाळात प्रशासनाच्या मदतीला धावून गेलेली औरवाड (ता. शिरोळ) येथील वजीर रेस्क्यू फोर्स मानधनाच्या प्रतीक्षेत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जलसमाधी मोर्चा आंदोलनावेळीही सुमारे दीडशेहून अधिक जवान पोलीस प्रशासनाच्या मदतीला होते. अशा वजीर रेस्क्यू फोर्सची सेवा अविरतपणे सुरु आहे. त्यांना कौतुकाची थाप मिळत असली तरी मानधनदेखील तितकेच गरजेचे आहे.
अब्दुल रऊफ निसार पटेल यांनी वजीर रेस्क्यू फोर्सची स्थापना केली. परिसरात वारंवार येणाऱ्या संकटात गावातील बांधवांची होणारी स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी सुरुवातीस सामाजिक उपक्रम हाती घेऊन युवकांमध्ये समाजकार्याची आवड निर्माण केली. यातील जवानांनी कोरोनाकाळात तालुक्यात जनजागृतीचे कार्य केले.
कोरोना नियमांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी हे जवान परिश्रम घेत आहेत. ३१२ जवान कोणत्याही मानधनाशिवाय समाजसेवा करण्यासाठी सज्ज असलेले दिसून येतात. कोरोना काळात मृत्यू झालेल्या रुग्णांचे दहन किंवा दफन करण्यासाठी यांनी पुढाकार घेतला. परिसरातील गावातील अनेक तरुण व तरुणी कोणतीही अपेक्षा न बाळगता उत्स्फूर्तपणे काम करत आहेत. महापूर काळात वजीर रेस्क्यु फोर्सने बहुमोल योगदान दिल्याने ते पूरग्रस्तांसाठी देवदूत ठरले आहेत.
महापूर व कोरोनाने निर्माण झालेल्या संकटामुळे लोकांमध्ये असलेल्या भीतीचे वातावरण कमी करण्यासाठी रेस्क्यू फोर्सने जनसेवेचे व्रत हाती घेतले आहे. या फोर्सचे जवान शिरोळ तालुक्यात तसेच कोल्हापूर, पंढरपूर जिल्ह्यात अविरतपणे दिवस-रात्र विविध ठिकाणी सेवा बजावत आहेत. पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम केल्याने प्रशासन आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा ताण कमी झाला आहे.
फोर्सच्या जवानांना मानधन देण्याच्या विषयावर प्रशासनाकडून केवळ चर्चा झाली. मात्र अजूनही निर्णय झाला नाही. शासनाने या जवानांना आपत्ती व्यवस्थापनामध्ये समाविष्ट करून शासकीय सेवेत काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.