प्रतीक्षा संपली; वीज जोडण्या सुरू
By Admin | Updated: February 16, 2017 00:03 IST2017-02-16T00:03:08+5:302017-02-16T00:03:08+5:30
साडेतीन हजार वीज मीटर : महिनाअखेरपर्यंत सर्व जोडण्या पूर्ण; तीन वर्षांत दीड लाख मीटर जोडली

प्रतीक्षा संपली; वीज जोडण्या सुरू
कोल्हापूर : जिल्ह्यातील सुमारे २०१२ पासून प्रलंबित असणाऱ्या विविध प्रकारांतील सुमारे ११ हजार ९३२ वीज जोडण्या मीटरच्या प्रतीक्षेत होत्या. त्यामध्ये घरगुती जोडण्यांची संख्या सुमारे ३८७१ होती, पण ‘प्रकाशगड’ कार्यालयाकडून आता कोल्हापूरवर प्रकाश पडला आहे. सुमारे साडेतीन हजार विजेची नवीन मीटर कोल्हापूर महावितरण कार्यालाकडे प्राप्त झाली आहेत. त्यामुळे वीज जोडण्यांची प्रतीक्षा संपली.
‘महावितरण’कडे घरगुती, दारिद्र्यरेषेखालील, व्यावसायिक, औद्योगिक, यंत्रमाग, कृषीपंप, सामाजिक नळ पाणीपुरवठा, पथदिवे व इतर अशा विविध प्रकारांतील ग्राहक वीज जोडण्या प्रतीक्षेत आहेत. अशा प्रतीक्षेतील ग्राहकांची एकूण संख्या ११ हजार ९३२ इतकी आहे. या ग्राहकांकडे प्रकाशगड कार्यालयाने लक्ष दिल्याने गेल्याच आठवड्यात सुमारे साडेतीन हजार वीज मीटर जोडण्यासाठी पाठविली आहेत. येत्या दोन दिवसांत या वीज मीटर जोडण्यांचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रदीर्घ काळ प्रतीक्षेत असलेल्या वीजग्राहकांना दिलासा मिळणार आहे. गेल्या तीन वर्षांत ‘महावितरण’कडून कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे १ लाख ५६ हजार ८१२ वीज जोडण्या झालेल्या आहेत.
२०१६ पर्यंत सर्व प्रकारांत सुमारे ६६८९ वीज जोडण्या प्रतीक्षेत होत्या. त्यामध्ये २८५३ घरगुती वीज मीटर जोडण्या ग्राहकांचा समावेश आहे, तर कृषीपंपसाठी २८९४ ग्राहक वीज मीटर जोडण्याच्या प्रतीक्षेत होते. यंदाच्या घरगुती वीज मीटर जोडण्या ग्राहकांच्या संख्येत डिसेंबर २०१६, जानेवारी २०१७ मध्ये अचानक संख्या वाढ झाली आहे.
गेल्याच आठवड्यात ‘प्रकाशगड’ कार्यालयाकडून सुमारे साडेतीन हजार घरगुती वीज मीटर कोल्हापूर जिल्हा कार्यालयाकडे प्राप्त झाली आहेत. त्यामुळे प्रलंबित असणाऱ्या घरगुती वीज ग्राहकांच्या घरी मीटर बसणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांची प्रतीक्षा संपली आहे. ही सर्व मीटर जोडण्या सुरू असतानाच दुसऱ्या टप्प्यातील प्रलंबित मीटरही आठवड्यात येणार आहे. त्यामुळे प्रतीक्षेतील सर्व वीज जोडण्यांची कामे फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण होणार आहेत.
कृषी पंपांचीही काही कनेक्शन देण्यात आलेली नाहीत, पण ज्या कृषीपंपासाठी पोल उभे करण्याची गरज नाही अशा कृषी पंप ग्राहकाला तातडीने वीज जोडणी करण्याचे काम सुरू आहे. यासाठी ‘महावितरण’कडे मुबलक प्रमाणात मीटर उपलब्ध आहेत, पण कृषीपंपापासून काही अंतरावर पोल उभे करण्यासाठी येणारा खर्च हा मोठ्या प्रमाणात आणि ‘महावितरण’ला करावा लागणार आहे; पण या खर्चाची तरतूद अद्याप झाली नसल्याने अशी अनेक कृषीपंप कनेक्शन प्रतीक्षेत राहिली आहेत.
तीन वर्षांत दीड लाख जोडण्या पूर्ण
गेल्या तीन वर्षांत सुमारे १ लाख ५६ हजार ८१२ वीज जोडण्या ‘महावितरण’कडून कोल्हापूर जिल्ह्यात केल्या आहेत. त्यामध्ये घरगुती ग्राहकांची संख्या सुमारे १ लाख ५ हजार ९६२ इतकी आहे, तर औद्योगिक ग्राहकांची संख्या १६ हजार ९८०, तर कृषी पंपधारकांची संख्या २३ हजार ९४५ इतकी आहे.
डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांत घरगुती वीज ग्राहकांची संख्या अचानक वाढली. यासाठी सुमारे साडेतीन हजार वीज मीटर ‘महावितरण’ला प्राप्त झाल्याने ही प्रतीक्षा आता संपली आहे. येत्या पंधरा दिवसांत सर्व घरगुती वीज जोडण्या केल्या जातील. कृषी पंपासाठीही ज्या ठिकाणी पोल उभे करण्याची आवश्यकता नाही तेथे त्वरित वीज मीटर देण्याचे आदेश दिले आहेत.
- जितेंद्र सोनवणे, प्रभारी मुख्य अभियंता महावितरण, कोल्हापूर परिमंडल