मच्छी मार्केटला प्रतीक्षा उद्घाटनाची
By Admin | Updated: December 22, 2015 00:52 IST2015-12-22T00:31:49+5:302015-12-22T00:52:01+5:30
आजरा येथे इमारत सहा महिन्यांपूर्वी पूर्ण : आठवडी बाजार मैदानाचा वापर उद्घाटनापूर्वीच सुरू

मच्छी मार्केटला प्रतीक्षा उद्घाटनाची
ज्योतीप्रसाद सावंत--आजरा येथे आठवडी बाजार ठिकाणच्या परिसराचे २५ लाखांचे काम पूर्ण होण्याआधीच गेल्या दीड वर्षांपासून वापरात आहे, तर मच्छी मार्केट इमारतीचे काम पूर्ण होऊन सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आला तरी केवळ उद्घाटनाची औपचारिकता पूर्ण न झाल्याने वापराअभावी ही इमारत कुलूपबंद अवस्थेत असल्याचा परस्परविरोधाभास दिसत आहे.
मुळातच ही दोन्ही कामे रेंगाळल्याने कशीबशी ठेकेदाराने पूर्ण केल्याचे स्पष्टपणे जाणवते. स्पर्धात्मक कृषी विकास प्रकल्प पुणे अंतर्गत आठवडी बाजार विकासासाठी तब्बल २४ लाख ७० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता. दोन वर्षांपूर्वी सुरू झालेले हे काम पूर्ण झाले आहे. काम सुरू झालेल्या पहिल्या दिवसापासूनच येथे भाजी विक्रेते नेहमीप्रमाणे जागेचा वापर आजतागायत करीत आले आहेत. त्यामुळे उद्घाटन हा प्रकार घडलेलाच नाही अथवा त्याची गरजही भासली नाही.
दुसरीकडे २५ लाख रुपये खर्चून मच्छी विक्रेत्यांकरिता मच्छी मार्केटची नवीन इमारत बांधण्यात आली आहे. आजरा येथे मच्छी विक्रेत्यांची संख्या मोठी आहे. शुक्रवार या आठवडा बाजारा दिवशी मच्छी विक्रेते रस्त्यावरच मच्छी विक्रीसाठी बसतात. हॉटेल मॉर्निंग स्टारपासून नव्या मच्छी मार्केटच्या इमारतीपर्यंत मच्छी विक्रेत्यांची प्रचंड गर्दी होते. केवळ इमारतीचे उद्घाटन झाले नाही म्हणून इमारत कुलूपबंद अवस्थेत आहे.यामुळे स्थानिक रहिवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
भाजी बाजार मैदानाप्रमाणे मच्छी मार्केटही तूर्तास मच्छी विक्रेत्यांकरिता वापरासाठी खुले करावे व उद्घाटनाची औपचारिकता नंतर पार पाडावी, अशी मागणी ग्रामस्थ करू लागले आहेत.