पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: December 23, 2014 23:51 IST2014-12-23T23:24:58+5:302014-12-23T23:51:47+5:30
कोडोलीत शेतकऱ्यांची गैरसोय : आवश्यक सुविधा उपलब्ध करा

पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
कोडोली : कोडोली (ता. पन्हाळा) येथे जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या जनावरांच्या दवाखान्याच्या इमारतीचे उद्घाटन अद्याप न झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांची कुचंबणा होत आहे.
कोडोलीत जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत जनावरांचा दवाखाना पूर्वीपासून कार्यरत होता. या दवाखान्यात उपलब्ध सोयीसुविधांची कमतरता आणि उपचारासाठी येणाऱ्या जनावरांची संख्या मोठी असल्याने शासनाने नव्याने सर्व सोयीनियुक्त दवाखाना उभारण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. अत्याधुनिक इमारतीबरोबरच जनावरांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा तयार करणे गरजेचे आहे; परंतु याठिकाणी इतर सोयीसुविधांचा अभाव दिसून येतो. यामुळे इमारत बांधण्यासाठी गंतुवलेले कोट्यवधी रुपये वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पशुवैद्यकीय विभागामार्फत उभारण्यात आलेल्या दवाखाना इमारतीचे उद्घाटन प्रतीक्षेत असल्याने कोडोलीसह परिसरातील शेतकरी व इतर लोकांची मोठी कुचंबणा होत आहे. सध्या शासकीय दवाखाना बंद स्थितीत असल्याने खासगी डॉक्टरांमार्फत जनावरांवर उपचार करून घेण्याची वेळ लोकांवर आली आहे.
मनसे कोडोली शहर व भ्रष्टाचार निर्मूलन समिती, पन्हाळा तालुक्याच्या कार्यकर्त्यांनी या कामाबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता समाधानकारक उत्तरे मिळत नाही. तरी सर्व सोयीनियुक्त दवाखाना सुरू करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा मनसे कोडोली शहराध्यक्ष नयन गायकवाड व भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष रमेश येनकर व इतर पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. (वार्ताहर)