शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:30 IST2021-08-14T04:30:46+5:302021-08-14T04:30:46+5:30

संदीप बावचे : शिरोळ : अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेला महापूर अनेक प्रश्न व आव्हाने घेऊन आलेला आहे. असा प्रत्येक ...

Waiting for help to farmers in Shirol taluka | शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा

शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा

संदीप बावचे :

शिरोळ : अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेला महापूर अनेक प्रश्न व आव्हाने घेऊन आलेला आहे. असा प्रत्येक वर्षाला महापूर येणार असेल, तर आम्ही शेती पिकवायची की नाही, असा प्रश्न शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा आहे. यंदा महापुरामुळे वीस हजार हेक्टर क्षेत्रातील तीस कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महापुरामुळे तालुक्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पीक पध्दतीत बदल करण्याची मानसिकता निर्माण झाली आहे.

२०१९ च्या महापुरानंतर सावरत असतानाच पुन्हा एकदा कृष्णेसह पंचगंगा, वारणा व दूधगंगा या नद्यांच्या महापुरामुळे शिरोळ तालुक्यात हाहाकार माजला. बघता-बघता ऊस, सोयाबीन, भुईमूग, भाजीपाला, फूलशेती, केळी यासह अन्य पिके पाण्याखाली गेली. तीन दिवसांच्या अतिवृष्टीने होत्याचं नव्हतं झालं.

शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणारा शेतकरी महापुरामुळे खचला आहे. उभी पिके पुराच्या पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. पूर ओसरल्यानंतर पिकांचा पालापाचोळा दिसत आहे. कुजलेली पिके शेतातून बाहेर काढली जात आहेत. शेतीचे भकास चित्र दिसू लागले आहे. कुजलेल्या पिकांची विल्हेवाट लावणे हे एक आव्हानच ठरत आहे. ज्या जमिनीवर सतत आठ-दहा दिवस पाणी साचून राहिले, त्या जमिनीतील जिवाणू मरून गेले आहेत. त्याचे पुन्हा संवर्धन करणे शिवाय पीकवाढीवर होणारे परिणाम देखील शेतकऱ्यांना सहन करावे लागणार आहेत. पिकामध्ये केलेली गुंतवणूक वाया गेली आहे. शेतकरी पुन्हा उभा राहण्यास तीन ते चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. पूरग्रस्तांच्या प्रश्नासाठी संघर्ष समित्यांचा एल्गार सुरू आहे. पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी अनेक आश्वासने सरकारने दिली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना भरीव मदतीची अपेक्षा लागून राहिली आहे.

फोटो - १३०८२०२१-जेएवाय-०७

फोटो ओळ -

शिरोळ-शिरटी मार्गावरील महापुराने खराब झालेले सोयाबीन पीक शेतकरी कापून टाकत आहेत. (छाया - सुभाष गुरव, शिरोळ)

Web Title: Waiting for help to farmers in Shirol taluka