आरक्षित जागेवर मैदानाची प्रतीक्षा
By Admin | Updated: January 20, 2015 23:47 IST2015-01-20T23:22:19+5:302015-01-20T23:47:27+5:30
स्वच्छतेत बाजी : बगिचा, मंडई, पोलीस चौकीची सोय नाही

आरक्षित जागेवर मैदानाची प्रतीक्षा
कोल्हापूर : बहुतांश फ्लॅट रहिवाशांचा प्रभाग असलेल्या जरगनगरमध्ये गेल्या तीन वर्षांपासून भेडसावत असलेले पाणी, ड्रेनेज, गटारी, रस्ते हे प्रश्न सोडविण्यात स्थानिक नगरसेवकांना यश आले आहे. मात्र विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान, मुलांना खेळण्यासाठी व नागरिकांना विरंगुळ्यासाठी बाग, भाजी मंडई अशा सोयी-सुविधा मात्र परिसरात नाहीत. मैदानासाठी महापालिकेने प्रभागातील एका मोठ्या जागेवर आरक्षण टाकले आहे. पण त्यावर पुढील कारवाई न झाल्याने ती जागा ओसाड पडली आहे.जरगनगर या प्रभागात लेआउट नं. १, २, ३, ४ अशाना कॉलनी, रामानंदनगर, जाधव पार्क, गुरुकृपा कॉलनी, मंडलिक पार्क, बळवंतनगर, इंदिरा घरकुल हा परिसर या प्रभागात मोडतो. प्रभागात आता वाढीव संख्या धरून नऊ हजार लोकसंख्या आहे. या परिसरातील बहुतांश भाग हा उच्च-मध्यमवर्गीयांचा आणि फ्लॅट संस्कृतीला आपलेसे केलेल्या नागरिकांचा आहे. पूर्वी हा प्रभाग रायगड कॉलनीला जोडला गेला होता; त्यामुळे बहुतांश कामे रायगड कॉलनीत झाली. परिणामी जरगनगर परिसर पाणी, रस्ते, ड्रेनेज, गटरींसारख्या विकासकामांपासून वंचित राहिला. गेली २० वर्षे राजकारणात असलेले सुनील पाटील यांनी राष्ट्रवादीकडून २०१० साली नगरसेवकपदाची निवडणूक लढविली. मतदानाच्या माध्यमातून नागरिकांनी टाकलेला विश्वास योग्य ठरवीत त्यांनी पहिल्याच वर्षी रस्त्यांच्या कामांना सुरुवात केली. महापालिकेचा निधी, राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ आणि माजी मंत्री सतेज पाटील यांच्या निधीतूनही प्रभागात विकासकामे झाली आहे. जरगनगर मेन रोड, या परिसराला जोडणारे मुख्य रस्ते, गटर्स, ड्रेनेज लाईन या सगळ्या सोयी प्रभागात आहेत. महापालिकेच्या शाळांकडे बघण्याचा कुत्सित दृष्टिकोन येथील ‘जरगनगर विद्यामंदिर’ या शाळेने खोडून काढला आहे. या शाळेत सध्या कंदलगाव, पाचगावसह शहरातील विविध भागांतून पंधराशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रभागात या सोयीसुविधा असल्या तरी विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी एकही मैदान नाही. महापालिकेने पाण्याच्या टाकीजवळील जागा त्यासाठी आरक्षित केली आहे. मात्र अजून तिची कार्यवाही केलेली नाही. जागामालक आणि महापालिका यांच्यातील वादाचा फटका येथील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसत आहे. शिवाय, परिसरात लहान मुलांना खेळण्यासाठी एकही बगीचा नाही, भाजी मंडई नाही. भाजी खरेदी करायची असल्यास गावात यावे लागते. परिसरात एक पोलीस चौकी आणि अग्निशमन दलाची सुविधा असावी, या मागणीकडेही महापालिकेने कानाडोळा केला आहे.
मानधनातून प्रभागात विकासकामे
नगरसेवक म्हणून मिळणाऱ्या मानधनाची रक्कम जमा करून पाटील यांनी प्रभागातील गटारींची कामे पूर्ण केली आहेत.
याशिवाय स्वत:च्या खर्चातून कचरा उठावासाठी कर्मचारी नेमले आहेत. आता स्वखर्चातून व लोकसहभागातून लेआउट नंबर २ येथे बागेची उभारणी करण्यात येणार आहे.
परिसराच्या स्वच्छतेबद्दल ‘संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानां’तर्गत प्रमाणपत्रही मिळाले आहे.