चीनहून येणाऱ्या खुर्च्यांची नाट्यगृहाला प्रतीक्षा
By Admin | Updated: July 16, 2015 00:49 IST2015-07-16T00:49:00+5:302015-07-16T00:49:00+5:30
‘केशवराव’चे काम अंतिम टप्प्यात : पडदा संगीतसूर्यांच्या जयंतीला की, नाट्यगृहाच्या शंभरीत उघडणार?

चीनहून येणाऱ्या खुर्च्यांची नाट्यगृहाला प्रतीक्षा
कोल्हापूर : कोल्हापूरचं सांस्कृतिक वैभव असणाऱ्या ‘संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहा’च्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, आता केवळ परदेशी खुर्च्यांची प्रतीक्षा उरली आहे. उद्घाटनाचा मुहूर्त संगीतसूर्यांच्या एकशे पंचविसाव्या जयंतीचा की, नाट्यगृहाच्या शतकाचा साधला जातो, याकडे रसिकांसह नाट्यकर्मींचेही डोळे लागून राहिले आहेत.
केशवराव भोसले नाट्यगृह व खासबाग मैदानाच्या नूतनीकरणासाठी राज्य शासनाने २२.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यांपैकी १० कोटी रुपयांचा निधी या कामासाठी खर्च झाला आहे. हे काम फेब्रुवारी २०१४ पासून सुरू आहे. ते आता संपत आल्याने या दोन्ही वास्तूंचे रूप पालटले असून, दोन्ही वास्तू देखण्या दिसत आहेत. नाट्यगृहाचा रंगमंच आणि प्रेक्षागृह प्रशस्त आणि देखणे झाले आहे. ही पूर्ण वास्तू लाकडामध्ये करण्यात आली आहे. डाव्या आणि उजव्या भिंतींवर कोल्हापूरची वैशिष्ट्ये सांगणारी म्युरल्स लावण्यात आली आहेत. नाट्यगृहात नव्याने ध्वनी व प्रकाशयोजना, वातानुकूलन अशा यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत. त्यांची कामे संपून येत्या काही दिवसांत त्यांची चाचणी होणार आहे. याशिवाय स्टीलची मजबूत, आकर्षक रेलिंगही करण्यात आली आहेत. त्यामुळे हे सांस्कृतिक चळवळीचे केंद्र रसिकांच्या सेवेत लवकर दाखल व्हावे, अशी अपेक्षा नाट्यकर्मी व रसिकांकडून होत आहे. याची आसनक्षमता यापूर्वी ७४२ इतकी होती. नव्या रचनेनुसार ती ७०० इतकीच राहणार आहे.
चीनहून ७०० खुर्च्या मागविल्या असून, यासाठी ७० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. नाट्यगृहाबाहेरील अपूर्ण कामही पूर्ण केले जाणार आहे. याशिवाय कँटीन व तिकीट खिडकीच्या मागणीचा विचार केला जाईल. आतापर्यंत २२.५ कोटींपैकी १० कोटींचा निधी आला होता. त्यामधून काम पूर्ण झाले आहे.
- नेत्रदीप सरनोबत,
शहर अभियंता, कोल्हापूर महापालिका
हा मुहूर्त साधला जाणार का ?
संगीतसूर्य केशवराव भोसले यांची १२५ वी जयंती ९ आॅगस्ट रोजी, तर नाट्यगृहाला १५ आॅक्टोबरला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या दोन्हींचा मध्य म्हणून केशवराव भोसले यांच्या जयंतीचा मुहूर्त साधण्याचा महापालिकेतून प्रयत्न केला जात आहे. मात्र, जोपर्यंत नाट्यगृहातील खुर्च्यांचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत उद्घाटनासाठीची तारीख ठरविता येईनाशी झाली आहे. गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ बंद असलेल्या या नाट्यगृहात नूतनीकरणानंतर कोणत्याही प्रकारची कमतरता ठेवायची नाही, असा प्रयत्न प्रशासनाकडून होत आहे. लवकरच हे नाट्यगृह रसिकांच्या सेवेत दाखल व्हावे, अशी अपेक्षा नाट्यकर्मी, रसिकांची आहे.
खुर्च्यांची उंची कमी-जास्त करणे ही तांत्रिक बाब
नाट्यगृहासाठी इटालियन मेड खुर्च्या चीनमधील लिडकॉम कंपनीकडून बनवून घेण्यात आल्या आहेत. आकर्षक, टिकाऊ, फोल्डेड अशा या खुर्च्या चीनहून जहाजाने १५ जुलैला मुंबईत आणि १८ जुलैपर्यंत कोल्हापुरात येणार होत्या. मात्र, अद्याप तरी त्या आलेल्या नाहीत. नाट्यकर्मींनी आसनांबद्दल शंका उपस्थित केली होती. त्याप्रमाणे ही बाब तांत्रिक असून, या खुर्च्यांमध्येच त्या खाली-वर करण्याची सोय आहे.