जातपडताळणी समितीला अर्जदार उमेदवारांची प्रतीक्षा
By Admin | Updated: December 1, 2014 00:03 IST2014-11-30T23:17:11+5:302014-12-01T00:03:43+5:30
प्रमाणपत्रे तयार : दाखले नेण्याचे आवाहन

जातपडताळणी समितीला अर्जदार उमेदवारांची प्रतीक्षा
कोल्हापूर : विभागीय जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने पडताळणी केलेली अडीच हजार प्रमाणपत्रे अर्जदारांंच्या प्रतीक्षेत आहेत. गेली दोन दिवस समितीेच्या विचारेमाळ येथील कार्यालयात या प्रमाणपत्रांचे वाटप सुरू आहे. कोल्हापूर, सांगली व सातारातील उमेदवारांनी कार्यालयाशी संपर्क साधून प्रमाणपत्र ताब्यात घेण्याचे आवाहन समितीचे उपायुक्त भालचंद्र मुळे व सदस्या वृषाली शिंदे यांनी केले आहे.
समितीने पडताळणी केलेले प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्जदारांनी जातीचा दाखला, ओळखपत्रासह स्वत: हजर राहणे गरजेचे आहे. ज्या अर्जदारांना प्रमाणपत्र घेण्यासाठी स्वत: हजर राहणे शक्य नाही, अशांनी आपले आई-वडील, बहीण-भाऊ किंवा चुलत्यांना पाठवून द्यावे; पण त्यांच्यासोबत ‘बार्टी’च्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेले अर्जदाराचे संमतीपत्र, अर्जदाराच्या जातीच्या दाखल्याची झेरॉक्स, ओळखपत्राची झेरॉक्स तसेच स्वत:चे ओळखपत्र द्यावे, त्याशिवाय दाखला दिला जाणार नाही. जातपडताळणी प्रमाणपत्र घेतल्यानंतर त्यावरील जातप्रमाणपत्र क्रमांक, स्पेलिंग व अन्य तपशील अर्जदारांनी तपासून घेण्याचे आवाहनही समितीने केले आहे.
समितीने गेल्या पंधरा दिवसांत शैक्षणिक, सेवा व निवडणुकीसाठी आलेल्या अर्जापक्षा तब्बल चार हजार जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने छाननी केली आहे. प्रमाणित केलेल्या प्रमाणपत्रे घेण्यासाठी समितीने अर्जदारांना एसएमएस पाठविले आहेत. प्रमाणपत्र देण्यासाठी चार खिडक्यांसह यंत्रणा सज्ज ठेवली आहे. रविवारी देखील हे कार्यालय सुरू होते. (प्रतिनिधी)