लेट कमर्स प्रकरणी ‘वेट अँड वॉच’
By Admin | Updated: November 25, 2014 23:55 IST2014-11-25T23:21:55+5:302014-11-25T23:55:42+5:30
जिल्हा परिषद : प्रशासनाची भूमिका

लेट कमर्स प्रकरणी ‘वेट अँड वॉच’
कोल्हापूर : जिल्हा परिषद कार्यालयात कार्यालयीन वेळेपेक्षा उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी रोखले. त्यावेळी लेट कमर्स मिळालेल्या ११५ कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ पाठविण्यात येईल, असे प्रशासनाने सांगितले होते. मात्र, अद्याप कारवाईसाठी प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले गेल्या चार दिवसांत उचलेली नाहीत. सध्या प्रशासन ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहे. त्यामुळे ‘लेट कमर्स’बद्दल प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.
शुक्रवारी (दि.१७) उपाध्यक्ष खोत यांनी सकाळी दहा वाजता कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ थांबून लेटकमर्सना पकडले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. परिणामी कर्मचारी आणि पदाधिकारी यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. संघर्ष सुरू आहे. कर्मचारी संघटना लेटकमर्सवर कोणतीही कारवाई होऊ नये, यासाठी प्रयत्नशील आहेत. उपाध्यक्ष लेटकमर्स व आंदोलन केलेल्यावर कारवाई व्हावी यावर ठाम आहे. दरम्यान, कारवाईचा निर्णय घेणारे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अविनाश सुभेदार कार्यालयीन कामकाजासाठी बाहेर आहेत. यामुळे कारवाईसंबंधी पुढे कोणतीही कार्यवाही झालेली नाही. कर्मचारी आणि पदाधिकारी यांच्यातील वाद मिटविण्यासाठी अध्यक्ष विमल पाटील प्रयत्नशील आहेत. मात्र, सध्या लेटकमर्सबद्दल प्रशासन काय भूमिका घेत ते पाहून पुढील निर्णय घेऊ,
असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कर्मचारी संघटनांचीही हीच भूमिका आहे. यामुळे सीईओ लेटकमर्सच्या कारवाईसंबंधी कोणता निर्णय घेतात यावरच पुढील दिशा ठरणार आहे. (प्रतिनिधी)
दोन दिवसांपासून कार्यालयीन कामकाजासाठी बाहेर आहे. त्यामुळे लेटकमर्सवरील कारवाईसंबंधी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. बायोमेट्रिकमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्याबद्दल नेमकी माहिती सध्या माझ्याकडे नाही, माहिती घेऊन सांगतो.
- सी. एन. वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन