वडनेरे,गाडगीळ समितीच्या शिफारशींचा जरूर अंमल करु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:23 IST2021-07-31T04:23:59+5:302021-07-31T04:23:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महापूर आल्यानंतर राज्य शासनाने ज्या तज्ज्ञांच्या समित्या नेमल्या, त्यांचे अहवाल आले आहेत. त्या अहवालातील ...

वडनेरे,गाडगीळ समितीच्या शिफारशींचा जरूर अंमल करु
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महापूर आल्यानंतर राज्य शासनाने ज्या तज्ज्ञांच्या समित्या नेमल्या, त्यांचे अहवाल आले आहेत. त्या अहवालातील शिफारशी अंमलात आणण्याचे धाडस नसते म्हणूनच ते बासनात गुंडाळून ठेवले जातात. मी असे घडू देणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. वडनेरे, गाडगीळ समितीपासून अन्य समित्यांचे आतापर्यंत जे अहवाल सादर झाले, त्यातील महत्त्वाच्या शिफारसी एकत्रित करून त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न राहील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री म्हणाले, सगळ्या अहवालांचे एकत्रिकरण करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यातील ठळक मुद्दे असतील ते एकत्रित करा. हे मुद्दे लोकांसमोर आले पाहिजेत. संकट आल्यावर उपाययोजना शोधण्यासाठी म्हणून आपण या तज्ज्ञांची मदत घेतली होती. त्याचा काही उपयोगच करणार नसेल तर अशा समित्या नेमूच नयेत असे मला वाटते. महापूर रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना-पर्याय सूचविले जातात, तसाच भिंत घालण्याचा पर्याय पुढे आला होता. मी त्यावेळी हा एक पर्याय असू शकतो एवढेच म्हटले होते. हा काय राज्य सरकारने घेतलेला निर्णय नाही. किंवा मला भिंत बांधायचीच आहे असेही नाही. लोकांचा त्याबद्दल आक्षेप असेल तर आम्हीही या पर्यांयाचा विचार करणार नाही. तज्ज्ञांनी सूचविलेल्या उपाययोजना करायच्या झाल्यास सरकार म्हणून आम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. त्यावेळी लोकांनीही त्यास सहकार्य करावे.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे कौतुक
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी महापुराच्या अगोदरच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याशी चर्चा करून अलमट्टीचे पाणी सोडण्याचे नियोजन केले होते. त्याचा चांगला उपयोग झाला, अन्यथा कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले असते अशी भीती मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.