वडनेरे समितीचीच गाळ काढण्याची शिफारस वेगळी समिती नाही : गाळ-वाळूचा अभ्यास आवश्यकच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:27 IST2021-07-30T04:27:41+5:302021-07-30T04:27:41+5:30
कोल्हापूर : नदी-नाल्यातील गाळ काढून त्यांचे प्रवाह सुरळीत करावेत ही महत्त्वाची सूचना महापुराचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या नंदकुमार ...

वडनेरे समितीचीच गाळ काढण्याची शिफारस वेगळी समिती नाही : गाळ-वाळूचा अभ्यास आवश्यकच
कोल्हापूर : नदी-नाल्यातील गाळ काढून त्यांचे प्रवाह सुरळीत करावेत ही महत्त्वाची सूचना महापुराचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या नंदकुमार वडनेरे समितीनेच केली असल्याने त्यासाठी नव्याने समिती नेमण्यात येणार नसल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. वडनेरे समितीने ढोबळ सूचना केली आहे, ही समिती स्थापन झाली असती तर पंचगंगा नदीतील गाळ व वाळूचा अभ्यास होण्यास मदत झाली असती, ते काम आता होणार नाही.
दरवर्षी पुराच्या पाण्यामुळे वाहत येणारी माती साचून पंचगंगा नदीपात्रात गाळ साचला असल्यास गाळ व वाळू काढून नदीचा प्रवाह सुरळीत ठेवता येईल का, याचा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव एकनाथ पाटील यांची समिती स्थापन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी येथे दिल्या होत्या. या समितीचे काम कधी सुरू होणार याबाबत अधिकृत सूत्रांकडे चौकशी केल्यावर ही समितीच अस्तित्वात येणार नसल्याचे सांगण्यात आले. शासकीय विश्रामधाममधील बैठकीनंतर ज्यांची समिती नेमण्याचे जाहीर करण्यात आले होते, त्या निवृत्त प्रधान सचिव एकनाथ पाटील यांनी उपमुख्यमंत्री पवार व पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली व त्यातील वस्तूस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यासाठी वेगळी समिती नेमण्याची गरज नसून गाळ काढण्याची शिफारस वडनेरे समितीनेच केली असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे समितीचा विषय तिथेच संपला असल्याचे सांगण्यात येते. सरकार नुसत्या समित्या नेमते व पुढे काय त्याचे होत नाही, अशीही टीका या समितीच्या घोषणेनंतर लोकांतून उमटली होती. मी वाळू काढायचे म्हटल्यावर त्यातून कोणतेही राजकारण होऊ नये, त्यातील नियम पाहून आणि लोकांची सुरक्षितता विचारात घेऊनच हा उपाय सुचविला असल्याचेही पवार यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते.