‘वडगाव बाजार समिती’ बिनविरोध
By Admin | Updated: August 1, 2015 00:53 IST2015-08-01T00:53:06+5:302015-08-01T00:53:06+5:30
अधिकृत घोषणा २३ आॅगस्टला : सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना संधी

‘वडगाव बाजार समिती’ बिनविरोध
पेठवडगाव : येथील वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या १९ जागांसाठी १९ अर्ज शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली आहे. मात्र, या निवडीची अधिकृत घोषणा २३ आॅगस्टला होणार आहे.
राज्यातील ११५ बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. त्यापैकी वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची एकमेव निवडणूक बिनविरोध झाली. आमदार महादेवराव महाडिक यांनी बिनविरोध होण्यासाठी ‘महाडिकनीती’ वापरली.
सुरुवातीस निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वपक्षीय समावेश पॅनेल महाडिक यांनी तयार केले. यामध्ये कॉँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, जनसुराज्य, आदी पक्षांचे उमेदवार निश्चित केले. प्रमुख पक्षातील कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाल्या आहेत. या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचे नेतृत्व महादेवराव महाडिक यांनी केले. त्यास प्रकाश आवाडे, विनय कोरे, निवेदिता माने, जयवंतराव आवळे, सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे सहकार्य लाभले.
या निवडणुकीसाठी ११२ उमेदवारांनी ११८ अर्ज दाखल केले होते. अर्ज मागे घेण्यासाठी सत्तारूढ गटास मोठी कसरत करावी लागली. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी शहाजीराव पाटील, मकरंद बोराडे, राजेश पाटील, दिलीप पाटील, सर्जेराव माने, श्रीकांत पाटील यांनी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांशी चर्चा करून अर्ज मागे घेण्याची विनंती केली. यात ९२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यांचा सत्कार आमदार महादेवराव महाडिक यांनी केला. (वार्ताहर)
बिनविरोध उमेदवार असे : बाळकृष्ण बोराडे (चावरे), नितीन चव्हाण (सावर्डे), संजय मगदूम (रुई), जगोंडा पाटील, काशिनाथ पुजारी (चंदूर). भटक्या विमुक्त जाती गट : बापूसाहेब मोठे (पट्टणकोडोली). इतर मागासवर्गीय गट : बरकत मुजावर (रुकडी). महिला गट : सुशीला सावंत (मौजे वडगाव), विमल चौगुले (आळते). ग्रामपंचायत मतदार गट : सुमेध ओऊळकर (कोरोची), अशोक गायकवाड (तारदाळ). आर्थिक दुर्बल गट : आनंदा भोसले (टोप). अनुसूचित जाती गट : रमेश पाटोळे (घुणकी). अडते व्यापारी मतदारसंघ : अनिलकुमार बोरा, संजय वठारे (इचलकरंजी). कृषी प्रक्रिया मतदारसंघ : अरुण पाटील (कुंभोज), हमाल-तोलारी मतदारसंघ : सुभाष भापकर (नीलेवाडी).