थोरातांच्या जाचाने वरूटेंचा राजीनामा
By Admin | Updated: August 24, 2014 00:41 IST2014-08-24T00:41:27+5:302014-08-24T00:41:58+5:30
शिक्षक संघाचे राजकारण : संभाजीराव थोरात यांच्यावर निशाणा

थोरातांच्या जाचाने वरूटेंचा राजीनामा
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजाराम वरुटे यांनी आज, शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा संघटनेकडे पाठविला. शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांचे चोचले पुरवू शकलो नसल्याने त्यांनी जाणीवपूर्वक त्रास सुरू केला होता. या त्रासाला कंटाळून पदाचा राजीनामा देत असल्याचे वरुटे यांनी कोल्हापुरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
वरुटे म्हणाले, मार्च २०१३ मध्ये शिक्षक संघाचा अध्यक्ष म्हणून बहुमताने राज्यातील शिक्षकांनी आपली निवड केली. गेल्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये संघटना
कशी चालविली जाते याचा
नमुना शिक्षकांसमोर ठेवला होता.
तालुकाबाह्य प्रशासकीय बदल्या रद्द केल्या, पूर्वी प्रशासकीय बदल्यांनी बाहेर गेलेल्या शिक्षकांना पुन्हा तालुक्यात आणले, मुख्याध्यापक पदावनतीला स्थगिती मिळविली, पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनवाढी मिळण्यासाठी प्रयत्न, असे अनेक प्रश्न ग्रामविकासमंत्री जयंत पाटील व ग्रामविकास राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या माध्यमातून मार्गी लावू शकलो; पण ज्यांनी बारा वर्षांच्या कारकिर्दीत एकही प्रश्न मार्गी लावला नाही, त्यांना आपली अडचण होऊ लागली. त्यांनी घेतलेल्या तिन्ही अधिवेशनाचा हिशेब अद्याप दिलेला नाही.
कोट्यवधी रुपये संघटनेला देणे लागत असताना संघटनाच आपले ८० लाख रुपये देणे लागते म्हणून वारंवार पैशांची मागणी संभाजीराव थोरात करत होते.
हिशेब मागितला, तर लगेच हाकालपट्टीची धमकी द्यायची. जिल्हाध्यक्षांची दिशाभूल करून कोषाध्यक्ष, कार्याध्यक्ष व सरचिटणीस यांना हाताशी धरून थोरात यांनी मनमानी कारभार सुरू केला. याला विरोध करण्यास सुरुवात केल्यानंतर आपल्या विरोधात कारस्थान रचली.
राज्यात शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत. ते सोडवायचे की, थोरातांचे चोचले पुरवायचे असा प्रश्न होता. त्यांनी निवडीपासून त्रास देण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या पैशांची मागणी आपण पूर्ण करीत नसल्याने त्यांनी षड्यंत्र सुरू केले. त्याला कंटाळून आज राजीनामा देत आहे; पण शिक्षक संघात कायम असल्याचेही वरुटे यांनी सांगितले. यावेळी शिक्षक बॅँकेचे संचालक व सर्व तालुकाध्यक्ष उपस्थित होते. (प्रतिनिधी)