बाजार समितीसाठी २३ जूनला मतदान शक्य
By Admin | Updated: May 6, 2015 00:24 IST2015-05-06T00:21:56+5:302015-05-06T00:24:25+5:30
अंतिम मतदार यादी प्रसिध्द : २१ मे पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात

बाजार समितीसाठी २३ जूनला मतदान शक्य
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची मंगळवारी २१८५९ मतदारांची अंतिम यादी प्रसिध्द झाली असून मतदान २३ जून ला होण्याची शक्यता आहे. निवडणूक कार्यालयाने प्रक्रियेची तयारी सुरू केली असून २१ में पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होऊ शकते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राधानगरीच्या प्रातांधिकारी मोनिका सिंह काम पाहणार आहेत.
बाजार समितीची निवडणूक विकास संस्था, ग्रामपंचायत, अडते-व्यापारी, हमाल-तोलाईदार, पणन प्रक्रिया अशा पाच गटात १९ जागांसाठी होत आहे. २००७ ला समितीच्या झालेल्या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉग्रेस-जनसुराज्य आघाडीने १९ पैकी १७ जागा जिंकत बाजी मारली होती. संचालक मंडळाला विविध कारणाने मुदतवाढ मिळत गेली आणि त्याचदरम्यान समितीवर प्रशासक आले. गेले दोन वर्षे समितीवर प्रशासक आहेत.
आता निवडणूकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मंगळवारी अंतिम यादी प्रसिध्द केली. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम प्रक्रियेने गती घेतली आहे. बाजार समिती पोटनियमानुसार अंतिम यादीनंतर पंधरा दिवसाने उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी पंधरा दिवसांचा तर माघारीसाठी अवघे दोन दिवस असतात.
माघारीनंतर पंधरा दिवसाने मतदान घेतले जाते. त्यामुळे साधारणता २१ में पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होऊ शकते.
अशी आहे जागांची विभागणी
विकास संस्था गट
एकूण जागा - ११
सर्वसाधारण- ७
महिला- २
भटक्या विमुक्त - १
ग्रामपंचातय गट
एकूण जागा - ४
इतर मागासवर्गीय- १
सर्वसाधारण- २
अनूसूचित जाती- १
आर्थिक दुर्बल- १
अडते व व्यापारी गट - २
हमाल-तोलाईदार - १
पणन प्रक्रिया - १
गटनिहाय मतदान असे-
तालुकाविकास संस्थाग्रामपंचायत
( एकूण मतदार)(एकूण मतदार)
करवीर२४७ (३१०८)११७(१२२४)
पन्हाळा२४८(३०२८)१११(९४५)
शाहूवाडी८८(१०६२)१०६(८२६)
राधानगरी१९७(२३२४)९८(८३३)
गगनबावडा६७(८०४)२९(२०९)
भुदरगड२०२(२३८४)९७(७५६)
कागल९४ (११८३)४४(४३५)
एकूण११४३ (१३८९६)६०२(५२२८)
असा असू शकतो संभाव्य कार्यक्रम :
२१ मे ते ४ जून - उमेदवारी अर्ज दाखल
६ जून - अर्जांची छाननी
९ जून - माघारीची अंतिम मुदत
२३ जून- मतदान