मतदारांना घ्यावी लागणार ‘रेणुका’ची शपथ

By Admin | Updated: April 10, 2015 00:57 IST2015-04-10T00:47:15+5:302015-04-10T00:57:15+5:30

आस्थेची मदत : फंदफितुरी टाळण्यासाठी सत्तारूढ गटाची युक्ती

Voters will have to take the oath of 'Renuka' | मतदारांना घ्यावी लागणार ‘रेणुका’ची शपथ

मतदारांना घ्यावी लागणार ‘रेणुका’ची शपथ

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या निवडणुकीत मतदारांना सौंदत्ती येथे जाऊन आई रेणुकादेवीची शपथ घ्यावी लागणार आहे. परडीवर हात मारून ‘मी सत्तारूढ पॅनललाच मतदान करीन,’ अशी शपथ घेतल्यानंतरच त्यांना कोल्हापुरात आणले जाणार आहे. निवडणुकीतील फंदफितुरी टाळण्यासाठी सत्तारूढ आघाडीने ही युक्ती शोधली आहे.
संघाची निवडणूक २३ एप्रिलला होत आहे. रिंगणातील दोन्ही प्रमुख पॅनलची घोषणा गुरुवारी झाल्यानंतर आता सत्तारूढ आघाडीने मतदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. पॅनलची रचना तरी भक्कम झाली आहे; परंतु काही जुन्या संचालकांबद्दल तेच-तेच चेहरे सत्तेचा लाभ घेत असल्याने लोकांत नाराजी आहे. ती नाराजी ठरावधारक मतदारांपर्यंत पोहोचू नये व एकगठ्ठा मतदान सुरक्षित व्हावे यासाठी त्यांना सहलीवर नेण्याचे नियोजन सत्तारूढ गटाने केले आहे. तसे ते प्रत्येक निवडणुकीवेळीच केले जाते.
सध्या प्रत्येक तालुक्यातील सुमारे पन्नास मतदारांना सहलीवर हलविण्यात आले आहे. अजून किमान हजारभर मतदारांना बाहेर हलविण्यात येणार आहे. त्या-त्या तालुक्यातील संचालक त्याचे नियोजन करीत आहेत. त्यामुळे आता उमेदवारी निश्चित झाल्यावर ‘बाबा, तू कधी येतोस सहलीला...?’ अशी विनंती करण्यासाठी संचालक ठरावधारक मतदारांचे उंबरठे झिजवू लागले आहेत. राजाराम कारखान्याचे मतदान १९ एप्रिलला आहे. अनेक ठरावधारक तिथेही मतदार असल्याने त्यांना आताच सहलीवर जाण्यास अडचण आहे. शिवाय ‘गोकुळ’च्या मतदानासाठीही आजपासून तब्बल चौदा दिवस आहेत. सहलीवर खाण्यापिण्याची व जे हवे ते मिळण्याची सोय असली तरी इतके दिवस बाहेर जाणे अनेकांना शक्य नसते. काहींची शेतीची कामे सुरू आहेत. काहींच्या कुटुंबांत लग्नकार्ये आहेत. त्यामुळे ते ‘शेवटच्या चार दिवसांतच तुमच्याबरोबर येतो,’ असे सांगून आताच सहलीवर जाण्यास टाळत आहेत.
या सहलीवर गेलेल्या सर्व मतदारांना २२ ला सकाळी सौंदत्ती येथील यल्लमा डोंगरावर देवीच्या दर्शनासाठी नेण्यात येणार आहे. तिथे देवीच्या मंदिरात ‘सत्तारूढ गटालाच मतदान करीन,’ अशी शपथ घेण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर त्यांना एकत्रित त्याच दिवशी रात्री कोल्हापुरात आणण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी मतदान झाल्यानंतरच त्यांना घरी सोडण्यात येईल.


‘सौंदत्ती’च का...?
मतदार असो की अन्य कोणीही; त्याने स्वत:च्या आईबाबांचे नाव घेऊनही जरी शपथ घेतली तरी तिच्याशी तो प्रामाणिक राहण्याची खात्री नसते; परंतु रेणुकादेवीच्या परडीवर हात मारून शपथ घेतल्यास मतदार देवीच्या भीतीपोटी उलटे काही करीत नाही. ही देवी आपले काहीतरी बरेवाईट करील, अशी लोकांना भीती वाटते व ती फक्त या देवीबद्दलच वाटत असल्याने ‘शपथविधी’चा कार्यक्रम डोंगरावर होणार आहे.

Web Title: Voters will have to take the oath of 'Renuka'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.