मतदारांच्या बोटावरील शाई जाणार; सही येणार!

By Admin | Updated: December 21, 2015 00:38 IST2015-12-21T00:10:21+5:302015-12-21T00:38:27+5:30

विधान परिषद निवडणूक : छायाचित्र असलेली यादी व सहीवर खातरजमा

Voters will get ink on the finger; Come true! | मतदारांच्या बोटावरील शाई जाणार; सही येणार!

मतदारांच्या बोटावरील शाई जाणार; सही येणार!

प्रवीण देसाई- कोल्हापूर -निवडणूक कोणतीही असो; मतदान केल्यावर मतदाराच्या बोटावर शाई आलीच. यंदाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी मात्र मतदारांच्या बोटावर शाई न लावण्याचा निर्णय भारत निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला आहे. त्याऐवजी मतदाराकडून सही घेतली जाणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मतदारांच्या बोटावर शाई दिसणार नाही.निवडणुकीतील गैरप्रकार टाळावेत, दुबार मतदान होऊ नये यासाठी निवडणूक यंत्रणेकडून मतदान झाल्यावर मतदाराच्या बोटावर शाई लावली जाते. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, महापालिका, विधानसभा, विधान परिषद, लोकसभा अशा निवडणुकांसाठी तिचा वापर होतो. सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत मात्र मतदारांच्या बोटावर शाई दिसणार नाही. त्याऐवजी मतपत्रिकेवरील भागावर संबंधित मतदाराची सही असणार आहे. तत्पूर्वी, सचित्र यादीनुसार तोच मतदार आहे का, याची खातरजमा केली जाणार आहे.
विधान परिषदेसाठी असणारी मतदारांची यादी यंदा प्रथमच सचित्र (यादीवर मतदाराचे छायाचित्र) करण्यात आली आहे. मतदानासाठी आलेल्या मतदाराचे तो मतदान केंद्रात आल्यापासून बाहेर पडेपर्यंत व्हिडीओ शूटिंग होणार आहे. आत प्रवेश देण्यापूर्वी मतदारांची पूर्णपणे झाडाझडती घेतली जाणार आहे. पेन, मोबाईल, डिजिटल कॅमेरे, आदी वस्तू घेऊन जाण्यास मनाई आहे. या वस्तू सोबत नाहीत ना? याची शहानिशा करूनच त्यांना आत सोडले जाईल. यामधून हाताचे घड्याळही सुटणार नाही. त्याचीही तपासणी केली जाईल.
प्रत्येक केंद्रात एका सूक्ष्म निरीक्षकाची नेमणूक करण्यात येणार आहे. ही नेमणूक निवडणूक निर्णय अधिकारी करतील. मतदानासाठी मतदार केंद्रात आल्यावर प्रथम त्याला मतपत्रिका दिली जाणार आहे. ती काऊंटर फाईल स्वरूपाची असेल. मतपत्रिकेच्या वरील भागात मतदाराचा अनुक्रमांक, मतदार यादीवरील क्रमांक व सही किंवा अंगठा यासाठी जागा ठेवण्यात आली आहे. यावर सही घेऊन, हा भाग फाडून संबंधित निवडणूक अधिकारी आपल्या ताब्यात घेईल व उर्वरित मतपत्रिकेचा भाग त्या मतदाराला देईल. त्यानंतर हा मतदार आपला हक्क बजावण्यासाठी मतदान कक्षाकडे जाईल. अशी ही प्रक्रिया असेल. एकंदरीत या निवडणुकीत शाई गायब होऊन खात्रीसाठी सहीच महत्त्वाची ठरणार आहे.


बारा सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक
जिल्ह्यातील १२ मतदान केंद्रांवर मतदानादिवशी सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून या नियुक्त्या करण्यात आल्या असून, हे निरीक्षक मतदार मतदान केंद्रात प्रवेश करून तो बाहेर जाईपर्यंत त्याच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवतील. मतदार आत येऊन बाहेर जाईपर्यंत त्यांचे पूर्ण व्हिडीओ शूटिंग केले जाणार आहे.
यंदा प्रथमच तहसीलदार झाले केंद्राध्यक्ष
इतर सर्व निवडणुकांमध्ये मतदान केंद्राध्यक्ष म्हणून इतरांचे आदेश काढणाऱ्या तहसीलदारांचीच या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी केंद्राध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Voters will get ink on the finger; Come true!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.