सतेज-महाडिक लढतीसाठी मतदारांकडून देव पाण्यात
By Admin | Updated: November 24, 2015 00:22 IST2015-11-23T23:41:26+5:302015-11-24T00:22:17+5:30
विधानपरिषद निवडणूक

सतेज-महाडिक लढतीसाठी मतदारांकडून देव पाण्यात
गणपती कोळी -- कुरुंदवाड -विधानपरिषदेची निवडणूक म्हणजे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांची दिवाळीच असते. मर्यादित मतदार असलेल्या या निवडणुकीत जितकी चुरस, तितके मताला मूल्य अधिक. त्यामध्ये महादेवराव महाडिक असतील तर निवडणुकीत रंग अधिक चढतो. कॉँग्रेसचे विद्यमान आमदार असलेले महादेवराव महाडिक या पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यात त्यांचे नाव मागे पडले असले तरी महाडिक यांनी स्पर्धेतून बाहेर तर पडू नये. याशिवाय ‘सतेज व महाडिक’ अशीच लढत लागावी, यासाठी अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांनी देव पाण्यात ठेवले आहेत.
सध्या विधानपरिषद निवडणुकीचे वारे जोरात वाहत असून, जिल्ह्यातील मातब्बर मंडळींना उमेदवारीचे डोहाळे लागले आहेत. या निवडणुकीत थेट जनतेचा संबंध येत नसला तरी जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना मतदानाचा हक्क असतो. यामध्ये महापालिका, नगरपालिकांचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापती, असे सुमारे ३५० मतदार आहेत. त्यामुळे ही निवडणूक म्हणजे मर्यादित मतदार असलेल्या मतदारांची दिवाळीच असते.
या मतदारसंघातून आमदार महाडिक एकवेळा अपक्ष, तर सध्या कॉँग्रेसचे प्रतिनिधित्व करीत आहेत. मतदार संख्येत कॉँग्रेसचे वर्चस्व असल्याने कॉँग्रेसकडून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक मातब्बर मंडळींचे अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न चालू आहेत. त्यामध्ये महाडिक व सतेज पाटील आघाडीवर असून, उमेदवारी मिळण्यापूर्वीच निवडणूक लढविण्याच्या ईर्ष्येने दोघांनीही प्रत्येक तालुक्यात जाऊन मतदारांची भेट घेऊन चर्चा केली आहे. दोन्ही उमेदवारांची पारंपरिक राजकीय ईर्ष्या मोठी असल्याने त्यांच्यात लढत लागली तर मतदारांना ‘मूँँह मागे दाम’ मिळणार आहे. त्यामुळे मतदारांच्या आशा रुंदावल्या आहेत. गत निवडणुकीत प्रत्येक मताला पाच लाखांचा गेलेला आकडा यंदा दहा लाखांच्या पुढे जाण्याची आशा आहे. त्यासाठी अनेक मतदारांनी येणाऱ्या निधीचा कसा विनियोग करावयाचा, याचेही आखाडे बांधले आहेत.
महाडिक यांचे एकाच घरात तीन पक्ष असल्याने व नुकत्याच झालेल्या कोल्हापूर महानगरपालिकेत भाजपशी आघाडी करून कॉँग्रेसला हात दाखविल्याने या निवडणुकीत कॉँग्रेस पक्षाकडून त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता अधिक गडद आहे. मात्र, महाडिक आणि सतेज यांच्या वादाला पर्याय म्हणून पी. एन. पाटील यांना उमेदवारी देऊन निवडणुकीत हवा काढून घेण्याची भीती मतदारांना लागली असून, कोणत्याही परिस्थितीत महाडिक यांनी माघार घेऊ नये व सतेज पाटील यांच्यातच लढत होऊन आपले स्वप्न सत्यात उतरावे, यासाठी अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांनी देव पाण्यात ठेवले आहेत. त्यामुळे मनोमनी इच्छा बाळगून राहिलेल्या या मतदारांना पाण्यातला देव कितपत पावतो? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.