मतदाराला द्याल दारू.. उमेदवारावर फुली मारू
By Admin | Updated: February 15, 2017 22:45 IST2017-02-15T22:45:07+5:302017-02-15T22:45:07+5:30
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अभियान ; हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार यांची माहिती

मतदाराला द्याल दारू.. उमेदवारावर फुली मारू
सातारा : ‘महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीच्या कालखंडात मतदाराला लालूच म्हणून मोठ्या प्रमाणात दारूचे आमिष दाखवले जाते. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू हस्तगत करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर परिवर्तन व्यसनमुक्ती संस्था आणि महाराष्ट्र अंनिस सातारा जिल्ह्यातर्फे मतदार जागृतीसाठी, ‘मतदाराला द्याल दारू.. उमेदवारावर फुली मारू’ नावाचे प्रबोधन अभियान राबवले जाणार आहे,’ अशी माहिती डॉ. हमीद दाभोलकर आणि प्रशांत पोतदार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात असे म्हटले आहे की, मतदारांना भुलविण्यासाठी मोठ्या प्रमाणात दारूचा वापर केला
जातो, असा सार्वत्रिक अनुभव आहे. खास करून तरुण वर्गामध्ये मोफत वाटल्या जाणाऱ्या दारूमुळे
अनेक तरुण निवडणुकीच्या कालखंडात व्यसनाचा पहिला अनुभव घेतात.
व्यसनाचा पहिला अनुभव घेतलेल्या लोकांच्या मधील जवळजवळ १२ टक्के लोकांना कालांतराने विविध तीव्रतेचे व्यसन जडते. या पार्श्वभूमीवर समाजाच्या हितासाठी उमेदवारी आहे, असा दावा करणारे सर्व पक्षीय उमेदवारांनी, तत्कालिक स्वार्थासाठी तरुण कार्यकर्त्यांना व्यसनांची चटक
लावणे ही अत्यंत घातक पद्धत आहे. त्यामुळे निवडणुकीतील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना, कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे या पक्षांनी आम्ही निवडणूक प्रचाराच्या दरम्यान दारूचे वाटप करणार नाही, अशी जाहीर भूमिका घ्यावी, अशी देखील मागणी या पत्रकाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे.
निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रमुख यांनी या विषयात लक्ष घालून निवडणुकी दरम्यान येणाऱ्या दारूच्या महापुराला आळा घालावा, अशी अपेक्षाही पत्रकाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे. या अभियानात महाराष्ट्र अंनिस जिल्हा कार्याध्यक्ष शंकर कणसे, सातारा अंनिस शाखा कार्याध्यक्ष वंदना शिंदे
आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहे. अशी माहितीही हमीद दाभोलकर व प्रशांत पोतदार यांनी दिली. (प्रतिनिधी)