पारंपरिक-पर्ससीननेट मच्छिमार यांच्यातील वाद विकोपाला

By Admin | Updated: December 2, 2014 23:31 IST2014-12-02T23:12:06+5:302014-12-02T23:31:27+5:30

शेकडो मच्छिमारांवर गुन्हे : निवती पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन; पारंपरिक मच्छिमारांचे आज ‘जेल भरो’ आंदोलन

Vivepala argues in the dispute between the traditional Persiansnet fishermen | पारंपरिक-पर्ससीननेट मच्छिमार यांच्यातील वाद विकोपाला

पारंपरिक-पर्ससीननेट मच्छिमार यांच्यातील वाद विकोपाला

कुडाळ : आमच्या हद्दीत येऊन प्राणघातक हल्ला करणाऱ्या मालवणच्या मच्छिमारांना त्यांच्या होड्यांसहित जोपर्यंत अटक केली जात नाही, तोपर्यंत येथून हलणार नाही, असा आक्रमक पवित्रा निवती-मेढा येथील मच्छिमारांनी घेऊन निवती पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरूकेले आहे.
मच्छिमारांनी दिलेल्या तक्रारीनुसार, निवती पोलिसांनी मालवणच्या ३०० ते ४०० मच्छिमारांवर गुन्हे दाखल केले असून, पारंपरिक व पर्ससीननेट मच्छिमार वाद आता विकोपाला गेला आहे, तर दुसरीकडे मालवणमध्ये पारंपरिक मच्छिमारांनी बैठक घेऊन गुन्हा दाखल केलेल्या घटनेचा निषेध करीत उद्या, बुधवारी जेल भरो आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.
काल, सोमवारी सायंकाळी निवती समुद्रातील आवारात मालवण व निवती मच्छिमारांमध्ये पारंपरिक व अपारंपरिक मच्छिमारांवरून सुरू असलेला वाद भर समुद्रातच उफाळून आला. या वादातून सुमारे १०० बोटींंमधून एकमेकांवर दगड, काचेच्या बाटल्या, लाकडी दांड्यांचा मारा केला. याची तक्रार आज, मंगळवारी निवती पोलीस ठाण्यात निवती-मेढा येथील मच्छिमारांनी दिली. निवती-मेढा येथील श्याम चंद्रकांत सारंग यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, निवती येथील मच्छिमार बांधव मालवण येथे गेले असता मच्छिमारांनी त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना सोडून दिले, तर काल मालवण येथील ३०० ते ४०० जण मालवण येथून समुद्रातून निवती बंदर येथे आले. पर्ससीन नेटने प्राणघातक हल्ला केला व जिवे मारण्याची धमकी दिली, असे म्हटले आहे. याप्रकरणी निवती पोलिसांनी अन्वय प्रभू, कल्पेश रोगे, संतोष परब, आप्पा लोबो, राजू परब, बाबू जोशी, महेश कोयंडे, रमाकांत धुरी, दत्ताराम जाधव, बाबू आमडोसकर यांच्यासह ३०० ते ४०० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)


योग्य ती कारवाई करू : चौरे
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी उत्तम चौरे दुपारी एक वाजता निवती पोलीस ठाण्यात दाखल झाले. तसेच पोलीस दलाची एक विशेष तुकडीही मागविण्यात आली होती.
निवती मच्छिमार वगळता कोणत्याही मच्छिमार संघटनेचे पदाधिकारी अथवा राजकीय नेते याठिकाणी फिरकले नाहीत.
उत्तम चौरे यांनी मच्छिमारांना शांत राहण्याचे आवाहन केले. तसेच वाद आपापसातच मिटवा, असे सांगून या घटनेतील आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले.


मच्छिमार आक्रमक
या हल्ल्यात शाम सारंग, सचिन धुरी व हेमंत खवणेकर जखमी झाले होते. पुरुषांवर हल्ला होत असल्याने समुद्रात उतरलेल्या महिलांवरही दगड फेकून हल्ला केला. त्यामुळे जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत येथून हलणार नाही, असा पवित्रा मच्छिमारांनी घेतला. त्यानंतर चौरे यांनी या प्रकरणातील मालवण येथील सर्व आरोपींना हजर करण्याचे आदेश दिले, परंतु याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे पोर्ट विभागाचे इन्स्पेक्टर विजय ऐनकर यांनी सांगितले.



निवती पोलीस ठाण्यात तणाव
निवती पोलीस ठाण्यात सकाळी १०.३० वाजल्यापासून निवती-मेढा येथील शेकडो मच्छिमार बांधव महिला-मुलांसहित तक्रार देण्यासाठी जमा झाले होते. आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत येथून हलणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला.

नोंद नसलेल्या
परप्रांतीयांना नोटिसा
बंदराची पाहणी करताना त्या ठिकाणी परप्रांतीयांचाही वावर आढळल्याने पोलिसांत नोंद नसलेल्या परप्रांतीयांना नोटिसा बजावा, असे आदेश चौरे यांनी दिले. निवती पोलीस ठाण्याचे निरीक्षक जगन्नाथ जानकर यांनी, या ठिकाणी केवळ सातच बोटी परवानाधारक असून, सुमारे ९५ बोटी बेकायदेशीर
असल्याचे सांगितले.
पारंपरिक मच्छिमारांचे आज ‘जेल भरो’ आंदोलन
निवती येथीलही सोमवारच्या संघर्षात पारंपरिक मच्छिमारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याचा निषेध म्हणून उद्या, बुधवारी जेल भरो आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा निर्णय पारंपरिक मच्छिमारांनी घेतला.

Web Title: Vivepala argues in the dispute between the traditional Persiansnet fishermen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.