अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन १५ दिवस बंद
By Admin | Updated: July 14, 2015 01:11 IST2015-07-14T01:09:37+5:302015-07-14T01:11:58+5:30
२३ जुलैपासून मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया

अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन १५ दिवस बंद
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीवर पुरातत्व खात्यातर्फे २३ जुलै ते ६ आॅगस्ट या कालावधीत रासायनिक संवर्धन प्रक्रिया होणार आहे़ त्यामुळे या कालावधीत श्री अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन भाविकांना घेता येणार नाही़
या काळात भाविकांसाठी उत्सवमूर्ती आणि कलश दर्शनाची सोय करण्यात आली आहे़ उत्सवमूर्तीचे दर्शन पितळी उंबऱ्यापासून घेता येईल़ ६ आॅगस्टला सायंकाळी देवीचे दर्शन पूर्वीप्रमाणे घेता येईल, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ़ अमित सैनी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली़
अंबाबाईच्या मूर्तीवरील रासायनिक संवर्धन प्रक्रियेबाबत श्री पूजक आणि देवस्थान समितीची बैठक शिवाजी पेठ येथील देवस्थान समितीच्या कार्यालयात झाली़ या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना डॉ़ सैनी यांनी ही माहिती दिली़ या पत्रकार परिषदेस समितीच्या सचिव शुभांगी साठे, सदस्य हिरोजी परब, प्रमोद पाटील, बी़ एऩ पाटील-मुगळीकर, संगीता खाडे, श्री पूजक मंडळाचे अजित ठाणेकर, गजानन मुनीश्वर, माधव मुनीश्वर, प्रसाद मुनीश्वर, अंबाबाई मंदिराचे व्यवस्थापक धनाजी जाधव, आदी उपस्थित होते़
डॉ़ सैनी म्हणाले, २२ जुलैला मूर्तीशी संबंधित धार्मिक विधी होणार आहेत़ यानंतर मूर्तीवर पुरातत्व खात्यातर्फे २३ जुलै ते ६ आॅगस्ट या कालावधीत रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे़ या काळात मूर्तीवर भक्तांकडून कोणत्याही प्रकारचा अभिषेक करता येणार नाही़ मंदिराची स्वच्छता करणे समितीला आणि श्री पूजकांना शक्य व्हावे, यासाठी ही प्रक्रिया ४ आॅगस्टपर्यंत पूर्ण करावी, अशी विनंती पुरातत्व खात्याला केली आहे़
रासायनिक संवर्धन प्रक्रियेदरम्यान मंदिराच्या परिसरात कोणत्याही प्रकारच्या चित्रीकरणाला परवानगी नाही़ मंदिरातील पडद्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे़ तसेच चित्रीकरण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे़ मंदिराशी संबंधित धार्मिक विधी हे गरूड मंडप, गारेच्या गणपतीसमोर करण्यात येतील, अशी माहिती डॉ़ सैनी यांनी दिली़