विकासाचे ‘व्हिजन’ ‘कोल्हापूर दक्षिण’मध्ये साकारणार

By Admin | Updated: November 16, 2014 23:51 IST2014-11-16T23:37:42+5:302014-11-16T23:51:18+5:30

माझा अजेंडा...! अमल महाडिक : पायाभूत सुविधा भक्कम करणार; उद्योग, व्यावसायिक प्रकल्पांना, स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य

Vision of development will be done in Kolhapur South | विकासाचे ‘व्हिजन’ ‘कोल्हापूर दक्षिण’मध्ये साकारणार

विकासाचे ‘व्हिजन’ ‘कोल्हापूर दक्षिण’मध्ये साकारणार

संतोष मिठारी - कोल्हापूर -चांगले रस्ते, मुबलक पाणी आणि अखंडित वीजपुरवठा या पायाभूत सुविधा माझ्या मतदारसंघात भक्कम करण्यावर माझा भर राहणार आहे. ‘व्हिजन’ घेऊन मी कार्यरत राहणार असून, जिल्ह्यात ‘कोल्हापूर दक्षिण’ला विकासाचे मॉडेल बनविणार असल्याचे सांगत आमदार अमल महाडिक यांनी मतदारसंघातील विकासाचा अजेंडा ‘लोकमत’शी बोलताना मांडला. आमदार महाडिक म्हणाले, निवडणुकीच्या प्रचारदौऱ्यावेळी ‘कोल्हापूर दक्षिण’ मतदारसंघ अगदी जवळून पाहता आला. त्यातून रस्ते, गटर्स, पाणी आणि वीज या पायाभूत सुविधांची कमतरता असल्याचे मला दिसून आले. शिवाय नागरिकांनी व्यक्त केलेल्या व्यथांमधून ते स्पष्ट झाले. त्यामुळे चांगले रस्ते, गटर्स, मुबलक पाणी आणि अखंडित वीजपुरवठा या पायाभूत सुविधा भक्कम करण्याला माझे प्राधान्य राहणार आहे. गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक आणि त्याशेजारील गोकुळ शिरगाव, तामगाव, कणेरीवाडी या गावांमधील ग्रामपंचायतींमध्ये सुसंवाद निर्माण करण्यासह आवश्यक त्या सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न राहणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या भूमिकेमुळे येथील उद्योजकांनी कर्नाटकात स्थलांतरणाचा निर्णय घेतला आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असल्याने त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी माझ्यापरीने प्रयत्न करणार आहे. मतदारसंघातील ग्रामपंचायती स्वावलंबी झाल्यास आपोआपच विकास साधला जाईल, त्यादृष्टीने प्रयत्न करणार आहे. पाचगाव, गोकुळ शिरगाव, आर. के. नगर, मोरेवाडी, आदी गावांमधील पाण्याचा प्रश्न गेले अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. येथील पाणीप्रश्न सोडविण्याच्यादृष्टीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासमवेत पहिली बैठक घेतली आहे. यात संबंधित गावांच्या प्रत्येक ग्रामपंचायतीने पाणी घेण्यासाठी आम्ही तयार आहोत, असा दाखला दिला आहे. त्यादृष्टीने प्रस्ताव तयार करून राज्य शासनाला पाठविणार आहे. स्वच्छ पाणी दिल्यास आरोग्याचा प्रश्न बऱ्यापैकी सुटतो. त्यामुळे मुबलक आणि स्वच्छ पाणी देण्याकडे लक्ष देणार आहे. ग्रामीण भागाला आरोग्याच्यादृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्रांची उपयुक्तता अधिक आहे. या केंद्रांमध्ये काही उणिवा असून, त्या दूर करून त्यांना भक्कम करणार आहे. प्राथमिक शाळांमधील स्वच्छतागृहे तसेच त्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य देऊन त्यांना बळकटी देणार आहे. औद्योगिक वसाहतींमधील ‘रॉ मटेरियल’मुळे होणाऱ्या पाणी, हवा प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अशा स्थितीत प्रदूषण टाळण्यासाठी अभ्यास करून आवश्यक ती यंत्रणा राबविणार आहे. यातील ‘ब्लॅक सँड’चा जो प्रश्न आहे, त्याबाबत पुनर्रवापर करता येईल. शिवाय त्यासाठी फौंड्री क्लस्टरचा अधिक चांगल्या पद्धतीने कसा वापर करण्यात येईल, याचा विचार सुरू आहे.
मतदारसंघात जे नवे प्रकल्प येतील अथवा जे सध्या कार्यरत आहेत, अशा ठिकाणी स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार देण्याला प्राधान्य राहील. मतदारसंघात शहरातील जे प्रभाग आहेत. त्यांना पायाभूत सुविधा पुरविणार आहे. शिवाय या ठिकाणी बगीचे, सार्वजनिक सभागृह, वॉकिंग ट्रॅक, वाचनालय, आदी सुविधांची पूर्तता करणार आहे. या मतदारसंघातून मी पहिल्यांदाच प्रतिनिधित्व करीत असल्याने जनतेला माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा बनविण्याचे काम सुरू आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करण्यावर माझा भर राहील. ‘कोल्हापूर दक्षिण’ला विकासाचे एक आदर्श मॉडेल बनविण्याचा माझा ध्यास आहे.
(उद्याच्या अंकात : आमदार प्रकाश आबिटकर)

होय ! यासाठी आग्रही
ग्रामपंचायतींना स्वावलंबी बनविणार
प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील उणिवा दूर करणार
प्राथमिक शाळांना बळकटी देणार
उद्योग, व्यावसायिक प्रकल्पांना स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य देणार
औद्योगिक वसाहत आणि ग्रामपंचायतींमध्ये सुसंवाद निर्माण करणार

Web Title: Vision of development will be done in Kolhapur South

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.