विश्वरत्न बाबासाहेबांची जयंती साधेपणाने साजरी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:24 IST2021-04-13T04:24:20+5:302021-04-13T04:24:20+5:30
कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे सलग दुसऱ्या वर्षी विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने व मोजक्याच कार्यकर्त्यांच्या ...

विश्वरत्न बाबासाहेबांची जयंती साधेपणाने साजरी होणार
कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे सलग दुसऱ्या वर्षी विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने व मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरी केली जाणार आहे. यानिमित्त ऐतिहासिक बिंदू चौकातील डाॅ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास मंगळवारी मध्यरात्री बारा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन केले जाणार आहे.
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व आंबेडकरी चळवळींसह बहुजन समाजातील कार्यकर्त्यांनी डाॅ. बाबासाहेबांची १३० वी जयंती साधेपणाने व मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. यानिमित्त माजी खासदार एस.के. डिगे मेमोरियल फाउंडेशनतर्फे शाहू स्मारक भवनात आज, मंगळवारी दुपारी तीन वाजता माजी आमदार मालोजीराजे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने समाजरत्न भीमक्रांती पुरस्कार वितरण केले जाणार आहे. रात्री बारा वाजता बिंदू चौकातील ऐतिहासिक पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून आतषबाजी केली जाणार आहे. आठवले गटातर्फे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे व अन्य सहकारी अभिवादन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी घरोघरी डाॅ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस अभिवादन करावे, असे आवाहनही कांबळे यांनी केले आहे. अशाच पद्धतीचे आवाहन पीपल्स रिपब्लिकन पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष दगडू भास्कर यांनी केले आहे. याशिवाय गावोगावी रक्तदान शिबिरे व मास्क, सॅनिटायझर व गरजूंना धान्य वाटप करून जयंती साजरी केली जाणार असल्याची माहिती आरपीआयचे नेते सतीश माळगे यांनी दिली.
भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती माेर्चातर्फे डाॅ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त देशभरात ११ एप्रिल ते ३१ मे २०२१ या कालावधीत संयुक्त महापुरुष जयंती महोत्सव अंतर्गत जिल्ह्यातील विविध गावांत १ हजार १०० केंद्रातही हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती सुहास कांबळे यांनी दिली.
सिद्धार्थनगरवासीयांतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही डाॅ. बाबासाहेबांची जयंती साध्या पद्धतीने व पारंपरिक उपक्रमांना बगल देऊन शांततेत व उत्साही वातावरणात साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या, बुधवारी सिद्धार्थनगरात यानिमित्त विद्युत रोषणाई, घरोघरी निळे झेंडे, बौद्ध धम्म ध्वज उभारले जाणार आहेत. बौद्ध विहार, राजर्षी शाहू महाराज समाज मंदिरामध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना अभिवादन केले जाणार आहे. दुपारनंतरची मिरवणूकही रद्द करण्यात आली आहे. सिद्धार्थनगरवासीयांनी मालोजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेतला असल्याची माहिती वसंत लिंगनूरकर यांनी दिली.
(फोटो स्वतंत्र दिला आहे)