विश्रामबाग-कुपवाड रस्ता आजपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2016 00:24 IST2016-11-10T23:42:59+5:302016-11-11T00:24:04+5:30
उड्डाण पुलाचे काम सुरू : वीस कोटींचा निधी मंजूर; वर्षभरासाठी दुसऱ्या मार्गे वाहतूक

विश्रामबाग-कुपवाड रस्ता आजपासून बंद
सांगली : विश्रामबाग येथील रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. त्यासाठी या रस्त्यावरील वाहतूक इतर मार्गावर वळविण्यात आली आहे. तसे फलकही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विश्रामबाग व लक्ष्मी देऊळ परिसरात लावण्यात आले आहेत. शुक्रवारपासून एक वर्षासाठी हा रस्ता बंद राहणार आहे.
विश्रामबाग ते लक्ष्मी देऊळ हा शहरातील वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्यावरून कुपवाड, वसंतदादा कारखाना, यशवंतनगर, अहिल्यानगर परिसराकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. शिवाय कुपवाड औद्योगिक वसाहतीकडे जाण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर विश्रामबाग चौकापासून थोड्याच अंतरावर रेल्वे गेट आहे. मिरज-पुणे रेल्वे मार्गावर रेल्वे फेऱ्यांची संख्याही अधिक असल्याने रेल्वेच्या वेळेत वारंवार वाहतुकीची कोंडी होते. या रस्त्यालाच पर्यायी रस्ता असलेल्या सह्याद्रीनगरमध्ये रेल्वे उड्डाण पूल आहे. त्यामुळे विश्रामबाग रेल्वे गेटवर उड्डाण पूल करण्यात मोठ्या अडचणी होत्या.
गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणी उड्डाण पुलाची मागणी होती. पण तांत्रिक कारणामुळे मंजुरीत अडथळे येत होते. अखेर चार-पाच महिन्यापूर्वी रेल्वे अर्थसंकल्पात येथील उड्डाण पुलाचा समावेश करण्यात आला असून, त्यासाठी २० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. यासाठी राज्य शासन व रेल्वे प्रशासनाकडून प्रत्येकी पन्नास टक्के हिस्सा आहे. नुकतीच त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, येत्या एक ते दोन दिवसात प्रत्यक्षात कामाला सुरूवात होणार आहे. या कामाची मुदत एक वर्षाची आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता वाहतुकीला बंद केला आहे. तसे फलकही या रस्त्यावर लावले आहेत. एक वर्षासाठी हा रस्ता बंद राहणार आहे. (प्रतिनिधी)
सह्याद्रीनगरमार्गे वाहतूक
विश्रामबाग ते लक्ष्मी देऊळ या रस्त्यावरील वाहतूक सह्याद्रीनगर रस्त्यावरून वळविण्यात आली आहे. लक्ष्मी देवळाकडून सांगली-मिरज-विश्रामबागला जाण्यासाठी सह्याद्रीनगर उड्डाण पुलावरून जावे लागेल. तसेच सांगली-विश्रामबागमधून लक्ष्मी देऊळमार्गे कुपवाडला जाण्यासाठी याच रस्त्यावरून वाहतूक सुरू राहणार आहे. लक्ष्मी देवळापासून आणखी एक रस्ता विश्रामबागकडे सुरू करण्यात आला आहे. पण या रस्त्यावरून जड वाहतूक बंद राहणार आहे.