विशाळगडावरील आंदोलन : पर्यटकांना मद्यपानापासून रोखण्याचे प्रयत्नदारूबंदीसाठी महिला सरसावल्या
By Admin | Updated: July 27, 2014 23:05 IST2014-07-27T21:58:32+5:302014-07-27T23:05:56+5:30
गेली तीन महिने पर्यटकांजवळची दारू पकडून नष्ट

विशाळगडावरील आंदोलन : पर्यटकांना मद्यपानापासून रोखण्याचे प्रयत्नदारूबंदीसाठी महिला सरसावल्या
राजू कांबळे - मलकापूर , सर्व धार्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या ऐतिहासिक किल्ले विशाळगडावर दारूबंदीसाठी मोलमजुरी करणाऱ्या रणरागिनी पुढे आल्या आहेत. गेली तीन महिने पर्यटकांजवळची दारू पकडून नष्ट केली जात आहे. त्यांना सामाजिक संघटनांच्या पाठबळाची गरज आहे. शाहुवाडी पोलिस सहकार्य करीत नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली. जिल्हा पोलिस प्रमुखांकडे न्याय मागणार असल्याचे वैशाली कांबळे यांनी सांगितले. कोल्हापूरच्या शिवशक्ती प्रतिष्ठानने या महिलांना पावसाळी रेनकोट, चप्पलांच्या जोडी, औषधोपचार पेटी आदी वस्तू भेट दिल्या आहेत.
किल्ले विशाळगडावर दररोज हजारो पर्यटक भेट देत असतात. सर्व धार्मियांचे श्रद्धास्थान असलेले ठिकाणाला सर्व धर्मांचे लोक भेट देतात. मात्र येथे गडाला भेट देण्याच्या नावाखाली मद्यपान केले जाते. गेल्या सहा महिन्यापासून गजापूर येथील मोलमजुरी करणाऱ्या महिलांनी संघटीत होऊन दारूबंदीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गजापूर-विशाळगड येथील पर्यटकांची दारू पकडून नष्ट केली जाते. पोलिसांत तक्रार दिली जाते. मात्र या महिलांना येथील दारू विक्रेत्याकडून धमक्या मिळत आहेत. शाहूवाडी पोलिस सहकार्य करीत नाहीत. तरीही या महिलांनी दारूबंदीची ज्योत अखंड तेवत ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या दारूमुळे गजापूर येथील ५०तरुणांनी आपला जीव गमावला आहे. पर्यटकांच्या दारुचा येथील समाजजीवनावर परिणाम होत आहे. काहीही झाले तरी विशाळगडावर दारूबंदी करणार असा निर्धार या महिलांनी केला. आहे.
दारूबंदी साठी प्रयत्न करणाऱ्या या महिलांना जिल्ह्यातील सामाजिक संघटना यांनी पाठबळ देणे गरजेचे आहे. मोलमजुरी करून आम्ही सामाजिक बांधीलकी म्हणून हे काम हाती घेतली आहे. दारूमुळे कुटुंबे उद्धवस्त होत आहेत याची झळ आम्हाला देखील बसली आहे. दररोज गडावर हमाली करतो या कामातून वेळ काढून आम्ही पर्यटकांजवळची दारू नष्ट करतो प्रसंगी आम्हाला शिवीगाळ, हाणामारी देखील होते. असे वैशाली कांबळे यांनी सांगितले. दारूबंदीसाठी वैशाली कांबळे, सुशिला कांबळे, शिला कांबळे, कोंडाबाई कांबळे, आवडाबाई कांबळे, तानाबाई कांबळे, या महिला दारूबंदीसाठी पुढे सरसावल्या आहेत.