वीरेंद्र तावडे कोल्हापुरात
By Admin | Updated: September 3, 2016 01:14 IST2016-09-03T01:12:33+5:302016-09-03T01:14:42+5:30
पानसरे हत्या प्रकरण : आज सत्र न्यायालयात हजर करणार

वीरेंद्र तावडे कोल्हापुरात
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणात चौकशीसाठी हिंदू जनजागरण समितीचा डॉ. वीरेंद्र तावडे याचा ताबा ‘एसआयटी’च्या पथकाने पुणे येरवडा कारागृहातून शुक्रवारी घेतला. तावडेला विशेष पथकाच्या सशस्त्र बंदोबस्तात शुक्रवारी रात्री ९.२५ वाजता कोल्हापुरात आणण्यात आले.
पोलिस मुख्यालयातील एका विशेष कक्षामध्ये डॉ. तावडे याला ठेवण्यात आले. आज, शनिवारी सकाळी अकरा वाजता सशस्त्र पोलिस बंदोबस्तात त्याला सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तावडेची संपूर्ण चौकशी ही ‘इन कॅमेरा’ होणार आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी ‘सीबीआय’ने अटक केलेल्या डॉ. तावडे याचे ‘कोल्हापूर कनेक्शन’ तपासात पुढे आले आहे. तो पानसरे हत्याप्रकरणातील ‘मास्टरमाइंड’ असल्याचा पोलिसांना संशय आहे. ‘सीबीआय’च्या तपासानंतर तावडे येरवडा कारागृहात होता. पुणे न्यायालयाने त्याचा ताबा घेण्याची परवानगी ‘एसआयटी’ला दिली होती. त्यानुसार ‘एसआयटी’चे प्रमुख संजयकुमार यांनी विशेष पथकाशी चर्चा करून शुक्रवारी डॉ. तावडेचा ताबा घेण्याचा निर्णय झाला. तपास अधिकारी तथा अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी तावडेचा ताबा घेत असल्याचे पत्र पुणे न्यायालयात हजर राहून सादर केले. त्यानुसार न्यायालयाने येरवडा कारागृहाच्या प्रशासनास तावडेचा ताबा ‘एसआयटी’कडे द्यावा, असे आदेश दिले. हा आदेश घेऊन शर्मा कारागृहात गेले. तिथून कारागृहाची प्रक्रिया पूर्ण करून दुपारी चार वाजता तावडेचा ताबा विशेष पथकाने घेतला. सशस्त्र पोलिस बंदोबस्तात तावडेला रात्री उशिरा कोल्हापुरात आणले. पोलिस मुख्यालयात त्याला एका विशेष कक्षामध्ये ठेवले. आज, शनिवारी त्याला सत्र न्यायालयात हजर करण्याची तयारी पथकाने केली आहे. यापूर्वी पथकाने तावडेची पत्नी निधी तावडे, दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य साक्षीदार संजय साडविलकर यांच्यासह काहीजणांचे जबाब नोंदविले आहेत.
चौकशीची आखणी
‘सीबीआय’कडून मिळालेल्या तपास अहवालावर चर्चा करून तावडेला ताब्यात घेतल्यानंतर त्याला कोणते प्रश्न विचारायचे, जेणेकरून ते तपासासाठी महत्त्वाचे असतील, याची आखणी पोलिसांनी केली आहे. पानसरे हत्येप्रकरणी काही परिस्थितिजन्य पुरावे हाती आले असून, त्यासंबंधी तावडेकडे चौकशी केली जाणार आहे. त्याला चौदा दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी विनंतीही तपास अधिकारी सुहेल शर्मा सत्र न्यायालयात करणार आहेत.
शहरात काही ठिकाणी फिरवणार
तावडे गंगावेश परिसरात वैद्यकीय सेवा देता होता. तो ज्या व्यक्तींना यापूर्वी येऊन भेटला, तसेच पानसरे व दाभोलकर यांच्या कोणत्या कार्यक्रमांना तो उपस्थित होता, याचीही चौकशी केली जाणार आहे. त्याने पानसरे राहत असलेल्या परिसराची रेकी केल्याचाही संशय आहे. अशा सर्व घटनास्थळांवर तपासासाठी त्याला फिरविणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुख्यालयासह सीपीआरमध्ये बंदोबस्त
वीरेंद्र तावडे याला रात्री उशिरा पोलिस मुख्यालयात आणले. त्याची सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याने मुख्यालयासह सीपीआर परिसरात सशस्त्र पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. साध्या वेशातही काही पोलिस परिसरात थांबून होते. या परिसरात ये-जा करणाऱ्या लोकांच्या हालचालींवर ते लक्ष ठेवून होते. बॉम्ब शोधपथकानेही या परिसराची पाहणी केली.
तोंड लपविण्याचा प्रयत्न...
वीरेंद्र तावडेची वैद्यकीय तपासणी सुरू असताना प्रसारमाध्यमांना अपघात विभागात प्रवेश करताना पोलिसांनी रोखले. त्यामुळे प्रसारमाध्यमांचे छायाचित्रकार आणि वृत्तवाहिनीचे क ॅमेरामन खिडक्यांचा आधार घेत त्याचे फोटो काढू लागले. यावेळी तावडेने रुमाल तोंडावर लावून चेहरा लपविण्याचा प्रयत्न केला.
मी ही डॉक्टर आहे...
सीपीआरमध्ये तावडेच्या छातीचा ईसीजी काढण्यात आला. यावेळी तावडेने डॉक्टरांना ‘मी पण डॉक्टर आहे. मला रक्तदाबाचा त्रास आहे. माझी जी औषधे आहेत, ती मला द्यावीत’, असे सांगितले. परंतु, सीपीआरमध्ये ही औषधे उपलब्ध नसल्यामुळे ती आणण्यासाठी एक डॉक्टर व पोलिस बाहेर गेले. खासगी औषध दुकानातून ती आणून तज्ज्ञ डॉक्टरांना दाखविण्यात आली. ही संपूर्ण प्रक्रिया पार पडण्यासाठी सुमारे तासाचा कालावधी गेला. त्यामुळे वैद्यकीय तपासणी होऊनही तावडे तासभर सीपीआरमध्ये थांबून होता.
तावडेसाठी विशेष डॉक्टरांचे पथक...
संशयित वीरेंद्र तावडे याच्या वैद्यकीय तपासणीसाठी पोलिसांच्या मागणीनुसार डॉक्टरांचे पथक देण्यात येणार आहे. हे पथक गरज भासल्यास तावडेची तपासणी करणार आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री सीपीआरमध्ये प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे यांच्यासह डॉ. बोरसे, डॉ. वसंत देशमुख, डॉ. शिवप्रसाद हिरुगडे, डॉ. हरिष पाटील, डॉ. सतीश शितोळे, डॉ. प्रियेश पाटील, आदींनी तावडेची सुमारे दोन तास वैद्यकीय तपासणी केली.
संशयित तावडेची वैद्यकीय तपासणी केली आहे. त्याचा रक्तदाब तपासण्यात आला असून, तो स्थिर आहे. त्यामुळे सध्या तरी त्याची तब्येत ठीक आहे.
- डॉ. शिशिर मिरगुंडे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, सीपीआर रुग्णालय, कोल्हापूर.
‘सीपीआर’मध्ये वैद्यकीय तपासणीवीरेंद्र तावडेला येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात शुक्रवारी रात्री ९.२५ वाजता आणले. त्यानंतर सीपीआरमधील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तावडेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सुमारे अर्धा तास ही तपासणी सुरू होती. यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह ५० पोलिस कर्मचाऱ्यांचा कडक बंदोबस्त होता
मुक्काम मुख्यालयात : वीरेंद्र तावडेला राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश होते; पण सुरक्षेअभावी त्याला पुन्हा शुक्रवारी रात्री पोलिस मुख्यालयात नेण्यात आले. त्या ठिकाणी त्याला ठेवण्यात आले.